

परतूर : हुजूर साहिब नांदेड-हडपसर एक्स्प्रेस रेल्वे (क्र. 17630) पुणे स्थानकापर्यंत जात नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. ही रेल्वे पूर्वीप्रमाणे पुणे स्थानकापर्यंत सोडण्यात यावी अशी मागणी रेल्वे प्रवाशांमधून करण्यात येत आहे.
हुजूर साहिब नांदेड ते पुणे ही गाडी पूर्वी नियमित पुणे स्थानकापर्यंत धावायची. परंतु ही गाडी मागील काही काळापासून हडपसर स्थानकापर्यंतच सोडण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थी, व्यापारी, नोकरदारवर्ग यांच्यासह इतरही प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. दक्षिण-मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी ही रेल्वे पूर्वीप्रमाणे पुणे स्थानकापर्यंत सोडावी अशी मागणी रेल्वे प्रवाशांमधून करण्यात येत आहे.
हुजूर साहिब-हडपसर ही रेल्वे पुढे पुणे स्थानकापर्यंत नेण्यासंदर्भात रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे. रेल्वेने दिलेल्या निवेदनाची दखलही घेतली आहे. परतूर रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने याबाबत पाठपुरावा सुरू आहे.
- स्वप्नील बी. मंत्री. अध्यक्ष, रेल्वे संघर्ष समिती