

जालना : जालना जिल्ह्यात जून महिन्याच्या अखेरीस पावसाने काही प्रमाणात समाधानकारक हजेरी लावली आहे. जिल्ह्यात १ ते ३० जुन पर्यत सरासरी ११९ मिमी पाऊस झाला. जिल्ह्यात सोमवारी सर्वदुर पडलेल्या पावसामुळे खरीपाच्या पेरणीस वेग आला आहे.
जिल्ह्यात मागील चोवीस तासात मंगळवारी (३० जून) पर्यंत जिल्ह्यात सरासरी १३.८ मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात मागील चोवीसत तासात तालुकानिहाय पडलेला पाऊस परतूर १४.७ मिमी, अंबड ३५.५ मिमी, घनसावंगी येथे १७.१ मिमी, जालना ११.६ मिमी, मंठा ११.४ मिमी, भोकरदन ११ मिमी, बदनापूर ९.२ मिमी तर जाफराबाद येथे ५.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
१ जून ते ३० जून या कालावधीत जालना तालुक्यात १६५.५ मिमी, अंबडमध्ये १४०.६ मिमी, परतूरमध्ये १३४.२ मिमी आणि बदनापूरमध्ये १२५.४ मिमी पावसाची नोंद झाली. तर भोकरदनमध्ये केवळ ७९.५ झाला. भोकरदन तालुक्यात इतर तालुक्याच्या तुलनेत कमी पाऊस पडला आहे.
वार्षिक सरासरीच्या तुलनेत जालना तालुक्यात आतापर्यंत २५.७ टक्के, अंबडमध्ये २३.६ टक्के, बदनापूरमध्ये २१ टक्के, परतूरमध्ये २०.३ टक्के, तर जिल्ह्याची सरासरी १९.७ टक्के इतकी झाली आहे. पावसामुळे खरीप हंगामात पिकांच्या लागवड व पेरणीसाठी शेतकऱ्यांनी गती घेतली आहे.