

जालना : अंबड व घनसावंगी तालुक्यातील नैसर्गिक आपत्ती अनुदान घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने कारवाई करीत महिला तलाठयास अटक केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 36 आरोपींना अटक करण्यात आली असून तपासाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे.
अंबड व घनसावंगी तालुक्यात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शासनाने 4 जी.आर. काढून बाधित शेतकऱ्यांना अनुदान जाहीर केले होते. मात्र याद्या अपलोड करताना संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर बोगस (शेती नावावर नसलेली) नावे समाविष्ट करून शासनाच्या निधीचा अपहार केल्याची तक्रार समोर आली होती. त्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमली होती.
चौकशीत 240 गावांमध्ये तब्बल 24 कोटी 90 लाख 77 हजार 811 रुपयांच्या शासकीय निधीचा अपहार झाल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास जालना आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे.
तपासा दरम्यान महिला तलाठी यांचा सहभाग आढळून आल्याने त्यांना जालना शहरातून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. आरोपीस अंबड येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
काही फरार
या प्रकरणात यापूर्वी 21 तलाठी, 3 सहायक महसूल अधिकारी, 3 कोतवाल व 9 एजंट अशा 36 जणांना अटक करण्यात आली आहे. काही आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहीती पोलिसांनी दिली.