

सुहास कुलकर्णी
जालना ः जालना शहरासह जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून खुना सोबत लूटमार व इतर गुन्ह्यात वाढ झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. व्यापारी नगरी म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या जालना शहरात भर रस्त्यावर पडणारे खुन,लुटमारीच्या घटनांमुळे व्यापारी व सर्व समान्य नागरीक दहशतीत आहे.
वाढत्या गुन्हेगारीवर वचक बसविण्यासाठी पोलिसांच्यावतीने ऑलआऊट ऑपरेशन व कोबिंग मोहिम राबविण्यात येत आहे.मात्र अशा मोहिमांमुळे गुन्ह्यावर लगाम लागणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जालना शहरात वाढत्या गुन्हेगारीवर वचक बसविण्यासाठी व आस्थापना वेळीच बंद करण्यासाठी पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांनी सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने गुरुवार (9) पासुनअपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या नेतृत्वा खाली शहरात 11.00 वाजे पासुन ऑलआऊट ऑपरेशन राबविण्यात येत आहे.
सदर कारवाई दरम्यान जालना शहरातील अपरात्री सुरु असणारे आस्थापने बंद करुन आस्थापना धारकांना त्यांच्या आस्थापणा वेळेत बंद करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहे. तसेच आर्म ॲक्ट प्रमाणे या पुर्वी दाखल असलेले रेकॉर्ड वरील 52 आरोपी चेक करुन 12 आरोपीतांना ताब्यात घेण्यात आले आहे.
कोबिंग मोहिमे दरम्यान अवैध वाळु वाहतुक करणाऱ्या एका हायवा वाहनांवर कारवाई करुन 25 लाख 30 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन हायवा चालक व मालका विरुध्द सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरात पोलिस विभागाकडुन गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रम स्तुत्य असला तरी प्रत्यक्षात गुन्हेगारीस आळा बसणार का या प्रश्नाचे उत्तर आगामी काही दिवसात मिळणार आहे.
पोलिस ठाण्यात येणाऱ्या नागरीकांचे गुन्हे नोंदवितांना नागरीकांना अडचणीचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी आहेत.याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.गुन्हेगारांमधे पोलिसांची दहशत तर सर्वसामान्यांना पोलिस आपले वाटले पाहिजे.
कारवाईत सहभाग
सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक अजयकुमार बसंल यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधीकारी अनंत कुलकर्णी, परिविक्षाधिन पोलिस अधीक्षक जानवी शेखर, पोलीस निरीक्षक पंकज जाधव, चंदनझिरा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप भारती , तालुका जालना पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे, तालका जालना पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जनार्धन शेवाळे यांच्यासह 126 पोलीस अमंलदार कारवाई सहभागी झाले होते.