

Gram Panchayat employees are aggressive for unpaid salaries, PF
टेंभुर्णी, पुढारी वृत्तसेवा : जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी प्रशासनाविरुद्ध एल्गार पुकारला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून थकीत असलेला पगार आणि भविष्य निर्वाह निधी न मिळाल्यामुळे त्रस्त झालेल्या १४ कर्मचाऱ्यांनी येत्या ५ एप्रिलपासून ग्रामसंसद कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
कर्मचाऱ्यांनी दिलेल्या निवेदनानुसार, थकीत पगार आणि पीएफ मिळावा यासाठी यापूर्वी ११ व २० मार्च रोजी प्रशासनाला विनंती पत्रे देण्यात आली होती. मात्र, प्रशासनाकडून यावर कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. प्रशासनाच्या या उदासीन धोरणामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असून, संताप व्यक्त केला जात आहे.
येत्या ७ ते ८ दिवसांत थकीत देणी अदा न केल्यास सर्व कर्मचारी काम बंद करून ५ एप्रिल पासुन सकाळी ११:०० वाजेपासून ग्रामसंसद कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसणार आहेत. या आंदोलनाची प्रत जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी, जाफराबाद तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलिस निरीक्षक आणि वैद्यकीय अधिकारी यांना पाठवण्यात आल्या आहे.
या आंदोलनात विक्रम उकांडे, अजीस शेख करीम, दिगंबर भिसे, बाबू साबळे, कोकीलाबाई भाले, शंकर आढावे, योगेश गायमुखे, रामदास धनवई, कपिल माने, अनिल गायकवाड, अनिस बागवान, ज्ञानेश्वर शेडगे, सुभाष घोडे आणि बाबासाहेब जमधडे या कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे.
प्रशासनाने या गंभीर प्रश्नाची दखल घेऊन कर्मचाऱ्यांचे प्रलंबित पगार व पीएफची रक्कम तातडीने अदा करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधूनही होत आहे.