Satara municipal council: माझी वसुंधरा अभियानात सातारा पालिका राज्यात प्रथम

महाबळेश्वर, पाचगणी पालिका अव्वल : संतोष पाटील राज्यात सर्वोत्तम जिल्हाधिकारी
Satara municipal council: माझी वसुंधरा अभियानात सातारा पालिका राज्यात प्रथम
Published on
Updated on

सातारा : माझी वसुंधरा अभियानांतर्गत अमृत गटात सातारा पालिकेने राज्यात प्रथम क्रमांक मिळवून 6 कोटींचे बक्षीस पटकावले आहे. तसेच, 15 हजारपेक्षा कमी लोकसंख्या गटात महाबळेश्वर पालिकेने प्रथम, तर पाचगणी पालिकेने द्वितीय क्रमांक मिळवला. महाबळेश्वर पालिकेने भूमी थीमॅटिक स्पर्धेतही बाजी मारली. या स्पर्धेत साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी राज्यस्तरावर उठावदार कामगिरी करत तिसरा क्रमांक पटकावला. तर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी पुणे विभागात अव्वल स्थान प्राप्त केले.

माझी वसुंधरा अभियानांतर्गत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था, तसेच राज्य व विभागस्तरावर सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने मंगळवारी जाहीर केली. पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वावर आधारित माझी वसुंधरा अभियान हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 2 ऑक्टोंबर 2020 पासून राबवण्यात येत आहे. माझी वसुंधरा अभियान 5.0 हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 1 जून 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीत राबवण्यात आले.

या अभियानामध्ये राज्यातील 422 नागरी स्थानिक स्वराज्य संस्था (महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायती) तसेच ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला होता. या अभियानासाठी डेस्कटॉप मुल्यमापन व फिल्ड मुल्यमान करण्यासाठी गुणांकन ठेवण्यात आले. त्यामध्ये अमृत गटासाठी 20 हजार 400 गुण, नगरपालिका व नगरपंचायतींसाठी 19 हजार 900 गुण, ग्रामपंचायत गटासाठी 19 हजार 50 गुण देण्यात आले. डेस्कटॉप मुल्यमापन व फिल्ड मुल्यमान त्रयस्त यंत्रणांमार्फत करण्यात आले. या दोन्ही मुल्यमापनातील एकूण गुणांच्या आधारे माझी वसुंधरा अभियान 5.0 मधील लोकसंख्यानिहाय 14 गटांतील विजेते तसेच महसूल विभाग व जिल्ह्याच्या एकूण कामगिरीवरून सर्वोत्तम विभागीय आयुक्त, सर्वोत्तम जिल्हाधिकारी व सर्वोत्तम मुख्य कार्यकारी अधिकारी यांची शासन मान्यतेनंतर निवड करण्यात आली आहे.

त्यानुसार अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये अमृत गट (राज्यस्तर) 1 लाख ते 3 लाख लोकसंख्या गटात सातारा पालिकेने प्रथम क्रमांक पटकावत दणदणीत यश मिळवले. सातारा पालिकेला 6 कोटींचे बक्षिस जाहीर झाले आहे. 15 हजार पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या पाचगणी नगरपालिकेने राज्यात प्रथम तर महाबळेश्वर नगरपालिकेने दुसरा क्रमांक पटकावला. पाचगणी नगपालिकेला 2 कोटी तर महाबळेश्वर नगरपालिकेला 1 कोटी 75 लाखांचे बक्षिस जाहीर झाले आहे. याशिवाय महाबळेश्वर नगरपालिकेने भूमी थीमॅटीक स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवत 1 कोटी 50 लाखांचे बक्षिस मिळवले आहे. ही आर्थिक मदत या नगरपालिकांना पर्यावरणपूरक प्रकल्प राबवण्यासाठी नवे बळ देणारी ठरणार आहे.

या नगरपालिकांनी शहरांचे हरित अच्छादन वाढवण्यासाठी मियावाकी वृक्षारोपण, अमृत वन, स्मृती वन, शहरी वने आणि सार्वजनिक उद्याने उभारणी यांसारखे उपक्रम प्रभावीपणे राबवले. जुने हरित क्षेत्राचे जतन व देखभाल, रोपवाटिका निर्मिती, रेन वॉटर हार्वेस्टिंग, नदी-नाले पुनर्जीवन तसेच अपारंपारिक ऊर्जा स्रोतांचा वापर आणि इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग पॉईंट उपलब्ध करून देत शाश्वत विकासाचा आदर्श ठेवला. यामुळे पर्यावरण संवर्धनासोबतच पर्यटन क्षेत्रातही सकारात्मक बदल घडून आला.

सातारा पालिकेने हरित क्षेत्र वाढ, प्लास्टिकमुक्त मोहीम, जलसंवर्धन उपक्रम आणि शहरांतील उद्यानांचे पुनरूज्जीवन या माध्यमातून प्रभावी कामगिरी केली. शहरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण मोहिमा राबवण्यात आल्या. एक नागरिक एक झाड संकल्पनेतून लोकसहभाग वाढवण्यात आला. महाबळेश्वर नगरपालिकेने पर्यटन आणि पर्यावरण यांचा समतोल राखत स्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापन आणि जैवविविधता जतनासाठी विशेष प्रकल्प राबवले. पावसाळी पाण्याचे संकलन आणि डोंगराळ भागातील मृदसंधारणाचे काम उल्लेखनीय ठरले.

पाचगणी नगरपालिकेने पर्यावरण शिक्षण, सेंद्रिय कचरा व्यवस्थापन, हरित ऊर्जा वापर यावर अधिक भर दिला. स्थानिक शाळा, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांच्या सहकार्याने अनेक उपक्रम यशस्वी केले. माझी वसुंधरा अभियानात अधिकाऱ्यांनीही केलेल्या कामगिरीची दखल राज्य शासनाने घेतली. एकूण कामगिरीच्या आधारे सर्वोत्तम जिल्हाधिकारी, सर्वोत्तम मुख्य कार्यकारी अधिकारी यांचाही गौरव करण्यात आला आहे. या अभियानात सर्वोत्तम कामगिरी करणारे सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी राज्यात तृतीय क्रमांक पटकावला आहे. तर साताऱ्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी व सध्याचे पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराज यांनी पुणे विभागात सर्वोत्तम कामगिरी केली. पाटण बीडीओ सरिता पवार यांनाही उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरवण्यात येणार आहे.

सातारा, महाबळेश्वर आणि पाचगणी नगरपालिकांच्या या यशामुळे जिल्ह्याची ओळख हरित सातरा म्हणून अधिक घट्ट झाली आहे. शासनाकडून मिळालेल्या भरघोस बक्षिसांमुळे आगामी काळात अधिक व्यापक आणि दीर्षकालीन प्रकल्प राबवण्यास बळ मिळणार आहे. पर्यावरण संवर्धनाच्या या राज्यव्यापी स्पर्धेत साताऱ्याने मिळवलेले यश हे पुरस्कारापुरते मर्यादित नसून भावी पिढ्यांना स्वच्छ, हिरवेगार आणि शाश्वत भविष्य घडवण्याच्या दिशेने उचललेले ठोस पाऊल आहे.

सीईओ याशनी नागराजन अन्‌‍ तीन ग्रामपंचायतींचा विभागात डंका

2 ते 3 हजार लोकसंख्या गटात खटाव तालुक्यातील वरूड तर 1.5 ते 2 हजार लोकसंख्या असलेल्या गटात सातारा तालुक्यातील कळंबे व 1 हजार पेक्षा कमी लोकसंख्या गटात समर्थगाव ग्रामपंचायतीने विभाग स्तरावर प्रथम क्रमांक पटकावून 50 लाख रुपयांचे बक्षीस मिळवले आहे. विभागस्तरावर सर्वोत्तम कामगिरी म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी पुणे विभागात प्रथम क्रमांक पटकावला. खंडाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल वाघमारे यांनी पुणे विभागात तृतीय क्रमांक, तर पाटण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सरिता पवार यांचाही सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल सन्मान केला जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news