

Gold and silver prices are rising.
जालना, पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही महिन्यांत सोने व चांदीच्या किंमतीत वाढ होत असल्याने भाव तेजीत असल्याचे चित्र आहे. सोन्या व चांदीच्या गुंतवणुकीतुन चांगला परतावा मिळत असल्याने अनेक गुंतवणुकदारांचा कल सोने व चांदी खरेदीकडे होतांना दिसत आहे.
जिल्ह्यात सोन्या-चांदीचे दर वाढत असल्याने गुंतवणूकदारांना आकर्षक परतावा मिळत आहे. दोन्ही मौल्यवान धातुंमध्ये गुंतवणूक करण्याकडे पुन्हा एकदा कल वाढताना दिसत आहे. सोने आणि चांदीच्या किमती सध्या पूर्णपणे नियंत्रणाबाहेर जात असल्याचे चित्र आहे. दररोज नवे उच्चांक नोंदवले जात असल्याने बाजारात प्रचंड चढ-उतार दिसून येत आहेत.
या तेजीमुळे किरकोळ ते मोठ्या संस्थात्मक गुंतवणुकदारांपर्यंत सर्वच जण उघडपणे सोन्या-चांदीत गुंतवणूक करताना दिसत आहेत. ही वाढ केवळ तात्पुरती नसून दीर्घकालीन स्वरूपाची असण्याची शक्यता अधिक आहे. जागतिक आर्थिक अनिश्चितता, वाढती औद्योगिक मागणी आणि सुरक्षित गुंतवणुकीकडे वाढणारा कल यामुळे मौल्यवान धातूंना सतत आधार मिळत आहे. त्यामुळे किमती रोखणे अवघड झाल्याने सोने आणि चांदी जवळपास दररोज नव्या विक्रमी पातळीवर पोहोचत असल्याचे दिसून येत आहे.
शहरातील सराफा बाजारात सोन्याच्या भावात शुक्रवारी १४४२ तर शनिवारी १ हजार ९५७ रूपयांची दरवाढ झाल्याने सोन्याने जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १ लाख ४३ हजार ६७७ रूपयांचा सर्वकालीन उच्चांकावर गेले होते. अशाच प्रकारे, शुक्रवारी १२ हजार ३६० रूपयांची चांदीच्या भावात दरवाढ झाल्याने चांदीने जीएसटीसह प्रति किलो २ लाख ४२ हजार ५० रूपयांचा उच्चांक केला होता. शनिवारी दिवसभरात पुन्हा तब्बल २० हजार ६०० रूपयांची दरवाढ झाली. त्यामुळे चांदीने २ लाख ६७ हजार रूपयांच्या ऐतिहासिक उच्चांकावर पोहचले.
चांगला लाभ सोने व चांदीच्या भावात होणारी वाढ लक्षात घेऊन अनेक गुंतवणुकदारांनी यात पैसे गुंतवणुकीस सुरुवात केली आहे. सोने व चांदीच्या भावात झपाट्याने होणारी वाढ गुंतवणुकदारांना चांगला फायदा मिळवुन देत असल्याचे पहावयास मिळत आहे.