Revenue officers protest : ऑनलाईन कामावर कर्मचाऱ्यांचा बहिष्कार
घनसावंगी ः राज्यशासनाकडून नवीन लॅपटॉप न दिल्याने घनसावंगी महसूल अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ऑनलाईन कामावर बहिष्कार टाकून आंदोलन सुरू केले आहे. मागण्याचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले की, ग्राम महसूल प्रशासनाचा कणा असलेल्या ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) व मंडळ अधिकाऱ्यांना शासनाकडून ऑनलाईन कामकाजासाठी पुरविण्यात आलेली लॅपटॉप, प्रिंटर व स्कॅनर ही साधने आता पूर्णतः जुनी, निकामी व कालबाह्य ठरली आहेत.
या उपकरणांमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड होत असून, त्यांची गती अत्यंत संथ झाल्याने दैनंदिन शासकीय कामकाजात मोठा अडथळा निर्माण होत आहे. मात्र, या गंभीर समस्येकडे शासन सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचा आरोप तलाठी संघटनांकडून करण्यात येत आहे.
सध्याच्या डिजिटल युगात महसूल विभागातील बहुतांश कामकाज ऑनलाईन पद्धतीने होत असताना, कालबाह्य साधनांवर काम करण्याची सक्ती केल्याने अधिकारी-कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण येत आहे. जुनी उपकरणे तातडीने बदलून नवीन, उच्च क्षमतेचे लॅपटॉप तसेच प्रिंटर-कम-स्कॅनर उपलब्ध करून द्यावेत, तसेच अलीकडे नियुक्त झालेल्या तलाठ्यांना आवश्यक सर्व डिजिटल साधने त्वरित पुरविण्यात यावीत, अशा मागण्या महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेने वेळोवेळी शासनाकडे निवेदनांद्वारे मांडल्या होत्या. मात्र, या मागण्यांवर केवळ आश्वासनांपलीकडे कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.
दरम्यान, बहिष्काराच्या काळात नागरिक व शेतकऱ्यांची होणारी गैरसोय ही शासनाच्या उदासीन धोरणामुळे होत असल्याचे तलाठी संघटनेने स्पष्ट केले आहे. शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेत आवश्यक डिजिटल उपकरणे उपलब्ध करून दिल्यास बहिष्कार मागे घेण्याबाबत विचार केला जाईल. अन्यथा आंदोलन अधिक तीव्र व व्यापक स्वरूपात छेडण्यात येईल, असा इशाराही तलाठी संघटनांकडून देण्यात आला आहे.
बहिष्कारामुळे ऑनलाईन सेवांवर परिणाम होणार
तलाठी, मंडळ अधिकारी यांनी ऑनलाईन कामकाजावर टाकलेल्या बहिष्कारामुळे 7/12 व 8-अ उतारा, ई-पीक पाहणी नोंदणी, ई-फेरफार प्रक्रिया, ऑनलाइन वाहन तपासणी, शेतकरी ओळखपत्र मंजुरी अशा महत्त्वाच्या ऑनलाइन सेवांवर परिणाम होणार आहे.
वर्षभरापासून शासनाकडे लॅपटॉप व प्रिंटर मिळण्यासाठी संघटनेच्या वतीने वेळोवेळी निवेदने देण्यात आलेली आहेत. परंतु, लॅपटॉप व प्रिंटर खरेदी करण्याबाबत ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे नाइलाजाने मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांना ऑनलाइन कामकाज बंद करणे भाग पडत आहे. या आंदोलनामुळे ऑनलाइन सातबारा वितरण, फेरफार नोंद, ॲग्रिस्टॅक नोंदणीस मंजुरी देणे, ई-चावडी व इतर अनुषांगिक ऑनलाइन कामकाज प्रभावित झाले आहे.
नारायण येवतीवाड, तालुकाध्यक्ष तलाठी संघ

