Jalna Rainfall : घनसावंगी तालुक्यात दुष्काळाचे सावट

मागील वर्षी अतिवृष्टीने हातचे पीक गेले; यंदा पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
Jalna Rainfall
घनसावंगी : तालुक्यात कित्येक दिवसांपासून पावसाने दाडी मारल्याने खरीप हंगामाती पिके सुकू लागली आहे. (छाया : अविनाश घोगरे)
Published on
Updated on

घनसावंगी : तालुक्यात यंदाचा पावसाळा शेतकऱ्यांची परीक्षा पाहत आहे. खरीप हंगामातील पिके सध्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यात असताना पावसाने मोठी उघडीप दिल्याने शेतकऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. पेरणीपासून आतापर्यंत शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने आणि खर्च करून पिके उभी केली आहेत. मात्र आता पिकांना पाण्याची नितांत गरज असताना पाऊस लांबत चालल्याने उभ्या पिकांचे भवितव्य धोक्यात आले आहे. तालुक्यात कोरड्या दुष्काळाचे सावट दिसून येत आहे.

यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीला झालेल्या पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन, मूग, तूर, मका यांसह विविध खरीप पिकांची पेरणी केली. सुरुवातीला पिके जोमाने उगवली. शिवार हिरवेगार दिसू लागल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. मात्र त्यानंतर पावसाने ओढ दिल्याने जमिनीतील ओलावा कमी होत आहे. अनेक ठिकाणी पिकांची वाढ खुंटली असून, पिके पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

Jalna Rainfall
Jalna News : ‘एसबीएम’ अन्‌ ‘जेजेएम’च्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे लाखो रुपयांचे वेतन रखडले

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या दैनंदिन चर्चेचा विषय सध्या फक्त पाऊस झाला आहे. सकाळी शेतात गेल्यानंतर पिकांची अवस्था पाहणे आणि आकाशात ढग आहेत का, याकडे लक्ष ठेवणे, असा दिनक्रम सुरू आहे. काळे ढग दाटून आले की पाऊस होण्याची आशा निर्माण होते; मात्र ढग पाऊस न पाडताच पुढे निघून गेले की शेतकऱ्यांची निराशा होते.

मागील वर्षी अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागला होता. शेतात उभी असलेली पिके पाण्याखाली गेली. मोठ्या कष्टाने उभे केलेले आणि हातातोंडाशी आलेले पीक डोळ्यादेखत वाहून गेले. अतिवृष्टीमुळे शेतजमिनीचेही मोठे नुकसान झाले आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक गणिताला मोठा फटका बसला.

Jalna Rainfall
Sambhajinagar Illegal Plot Sale : देवळाईतील बेकायदा प्लॉटिंगवर अखेर गुन्हा दाखल

प्रशासनाने तालुक्यातील पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून सद्यस्थितीचा आढावा घ्यावा, पावसाअभावी नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत व मार्गदर्शन द्यावे, अशी मागणी घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांतून होत आहे.

शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा भार

शेतीसाठी लागणाऱ्या बियाणे, खत, औषधे, मजुरी आणि मशागतीच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्यातच मागील हंगामातील नुकसानीचा फटका अजूनही अनेक शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. अशा परिस्थितीत यंदाचे पीकही पावसाअभावी वाया गेल्यास आर्थिक संकट आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.

शेतकर्‍यांचे डोळे आभाळाकडे

गेल्या वर्षी पाण्याने मारलं, यंदा पाण्यावाचून मारू नका,” अशी आर्त भावना शेतकऱ्यांच्या तोंडून व्यक्त होत आहे. सध्या शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले असून, एक समाधानकारक पाऊस येऊन उभ्या पिकांना जीवदान मिळावे, एवढीच त्यांची अपेक्षा आहे. अन्यथा मागील वर्षीच्या ओल्या दुष्काळानंतर यंदा कोरड्या दुष्काळाचे संकट शेतकऱ्यांच्या दारात उभे ठाकण्याची भीती आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news