

अविनाश घोगरे
घनसावंगी ः तालुक्यातील मूर्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत “माझी शाळा माझा अभिमान” या उपक्रमांतर्गत लोकसहभागातून शाळेचा सर्वांगीण विकास साधत तिचे रूप पूर्णपणे बदलण्यात आले आहे. ग्रामीण भागातील शाळाही आधुनिक, सुसज्ज आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी होऊ शकते, याचे उत्कृष्ट उदाहरण या शाळेने घालून दिले आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी पी. एम. मिन्नू यांच्या प्रेरणेने तसेच गटशिक्षणाधिकारी रवींद्र मधुकर जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. शालेय व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि ग्रामस्थ यांच्या एकत्रित प्रयत्नातून हा उपक्रम प्रत्यक्षात उतरला.
या उपक्रमाची सुरुवात दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या शुभ मुहूर्तावर करण्यात आली. सुरुवातीपासूनच गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शाळेसाठी निधी उभारणीस हातभार लावला. ग्रामस्थ, माजी विद्यार्थी, विविध संस्था, शिक्षक मित्रमंडळ तसेच ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने तब्बल 4 लाख 80 हजार रुपयांचा निधी उभारण्यात आला. विशेष म्हणजे कोटा पॅटर्न परिवार, परभणी यांनी 51 हजार रुपयांची मदत केली, तर शाळेतील शिक्षकांनीही 25 हजार रुपयांचा निधी दिला.
या निधीतून शाळेच्या भौतिक सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा करण्यात आली. संपूर्ण शाळेची आकर्षक डिजिटल रंगकाम करण्यात आले. इमारतीवरील जुन्या पत्र्यांच्या जागी नवीन पत्रे बसविण्यात आले. विद्यार्थ्यांना उष्णतेपासून दिलासा मिळावा यासाठी आतून व बाहेरून थंडावा देणारा रंग देण्यात आला. शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी आरओ शुद्धीकरण यंत्राची व्यवस्था करण्यात आली.
शैक्षणिक गुणवत्तेलाही विशेष महत्त्व देत या शाळेत इंग्रजी विषयासाठी फोनेटिक्स शिक्षण पद्धती हा विशेष उपक्रम राबविला जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी विषयाबद्दलची भीती कमी होऊन आवड निर्माण झाली आहे. याशिवाय विविध स्पर्धा परीक्षा, उपक्रम व शैक्षणिक कार्यक्रमांचे नियमित आयोजन केले जात असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळत आहे. प्रत्येक गावात असा उपक्रम राबविण्याची गरज आहे.
या उपक्रमासाठी शालेय व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत कार्यालय, ग्रामस्थ, माजी विद्यार्थी, मुख्याध्यापक राजू तौर व सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले. तसेच केंद्रप्रमुख सुनील खोडदे (पिंपळगाव) व प्रमोद येडले (गुंज) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या उपक्रमात योगदान देणाऱ्या सर्व दात्यांचा व सहकार्य करणाऱ्यांचा ऋणनिर्देश सोहळा 7 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला असून, या निमित्ताने गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
परसबाग फुलली
शाळेचे संपूर्ण विद्युतीकरण करण्यात येऊन प्रत्येक वर्गात दोन ट्यूब व दोन पंखे बसविण्यात आले. शाळेत परसबाग तयार करण्यात आली. तसेच शाळेभोवती सुरक्षिततेसाठी संरक्षक कुंपण उभारण्यात आले. विद्यार्थ्यांना बसण्यासाठी आवश्यक आसनव्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली.