Jalna Water Scarcity : घनसावंगी तालुक्यात पाण्याअभावी ऊस होरपळला

तलाव, विहिरी, बोअरवेल आटले; ऊस तोडणीची मागणी
Jalna Water Scarcity
Jalna Water Scarcitypudhari photo
Published on: 
Updated on: 

अविनाश घोगरे

घनसावंगी :तालुक्यासह मच्छिंद्रनाथ चिंचोली व सिंदखेड शिवारात दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत असून, पाण्याअभावी ऊस पीक डोळ्यादेखत जळू लागले आहे. परिसरातील मच्छिंद्रनाथ चिंचोली तलाव, मांदळा येथील तलाव, देविदेहगाव येथील तलाव यासह शेतातील विहिरी, बोअरवेल आणि शेततळीही पूर्णपणे आटल्याने उसाला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांकडे आता कोणताही पर्याय उरलेला नाही.

वर्षभर कष्ट करून उभे केलेले पीक वाचविण्यासाठी धडपड सुरू असतानाच पाण्याअभावी ऊस हातातून जाण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या परिसरातील ऊस तातडीने तोडणी करून गाळपासाठी न्यावा, अशी आर्त मागणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.

Jalna Water Scarcity
Chhatrapati Sambhajinagar Crime : विदेशी मद्याची तस्करी करणारा सैन्य दलाचा हवालदार गजाआड

यासंदर्भात कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना युनिट क्रमांक १ व २, समृद्धी शुगर लिमिटेड तसेच ब्लू सफायर साखर कारखान्यांच्या अध्यक्ष व संचालक मंडळाकडे निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले की, मच्छिंद्रनाथ चिंचोली व सिंदखेड परिसरात यंदा पावसाने मोठी ओढ दिल्याने दुष्काळाची परिस्थिती गंभीर बनली आहे. सुरुवातीला उपलब्ध पाण्यावर शेतकऱ्यांनी ठिबक, पाइपलाइन आणि इतर उपाय करून ऊस जगविण्याचा प्रयत्न केला.

मात्र, आता परिसरातील प्रमुख तलावांमधील पाणीसाठा संपला आहे. मच्छिंद्रनाथ चिंचोलीचा तलाव, मांदळा येथील तलाव आणि देविदेहगाव येथील तलाव कोरडे पडले आहेत. त्याचबरोबर शेतातील विहिरी, बोअरवेल आणि शेततळीही आटल्याने उसाला पाणी देणे अक्षरशः अशक्य झाले आहे. त्यामुळे आता कारखान्यांनी परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन मच्छिंद्रनाथ चिंचोली व सिंदखेड शिवारातील ऊसतोडणीला प्राधान्य द्यावे. जास्तीत जास्त ऊसतोडणी व वाहतूक टोळ्या उपलब्ध करून देऊन दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा ऊस तातडीने गाळपासाठी न्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

Jalna Water Scarcity
Mumbai Share Trading Fraud: आधी नफ्याचे पैसे दिले, नंतर कोट्यवधींचा गंडा! मुंबईतील व्यावसायिकाची ४.९२ कोटींची फसवणूक

शेतकरी दुहेरी संकटात

दुष्काळाच्या काळात ऊस हे शेतकऱ्यांच्या घराचा मोठा आर्थिक आधार असते. याच पिकाच्या उत्पन्नातून मुलांचे शिक्षण, घरखर्च, कर्जाचे हप्ते, औषधोपचार आणि वर्षभराचा संसार चालविण्याची अपेक्षा असते. ऊस वाचविण्यासाठी पाणी नाही आणि ऊस शेतात ठेवला तर तो जळून जाण्याची भीती, अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे.

ऊस तोडणीचे नियोजन करा

कारखाना प्रशासनाने शिवाराची प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीची गंभीरता समजून घ्यावी आणि पाण्याअभावी जळत असलेल्या ऊसाला तातडीने तोडणीचे नियोजन करावे. पाण्याचा एकही स्रोत शिल्लक नसताना शेतात ऊस उभा ठेवणे म्हणजे शेतकऱ्याची वर्षभराची मेहनत आणि त्याच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची आशा जळताना पाहण्यासारखे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news