

छत्रपती संभाजीनगर : सैन्य दलाच्या कँटीनमधून अवघ्या ५० टक्के सवलतीत मिळणारे उच्च दर्जाचे विदेशी मद्य परस्पर गोळा करून, त्यावर २० ते ३० टक्के नफा कमवत बाहेर विक्री करणाऱ्या सैन्य दलातील एका हवालदाराला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने बेड्या ठोकल्या. ही कारवाई गुरुवारी (दि.८) रात्री ओयासिस चौकात करण्यात आली. याप्रकरणी उत्पादन शुल्क विभागाच्या 'ड' पथकाने कारसह ६ लाख ९२ हजार ७२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
संताराम विठ्ठल पदातुरे (रा. भुतेकरवाडी, ता. अहमदपूर, जि. लातूर; सध्या रा. अदर रैंक लाईन, ३६ मीडियम मराठा बटालियन, छावणी, छत्रपती संभाजीनगर) असे ताब्यात घेतलेल्या सैन्य दलातील हवालदाराचे नाव आहे.
गुप्त माहितीच्या आधारे उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर रस्त्यावरील ओयासीस चौकात सापळा रचून पदातुरे याची कार (एमएच-२२-एस-१५३०) अडवली. वाहनाची झडती घेतली असता, केवळ सैन्यासाठी राखीव असलेल्या उच्च दर्जाच्या स्कॉच, व्हिस्की, बँडी, बिअर व रमच्या ७५० मि.ली. क्षमतेच्या ८३ सीलबंद बाटल्या आढळून आल्या.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क छत्रपती संभाजीनगर विभागाचे प्रभारी विभागीय उप-आयुक्त तथा अधीक्षक अभिनव बालुरे आणि उप-अधीक्षक गुणाजी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली 'ड' विभागाचे निरीक्षक अजय टी. बगाटे, दुय्यम निरीक्षक बाळासाहेब नवले, दुय्यम निरीक्षक गणेश उंडे, सहायक दुय्यम निरीक्षक गणेश नागवे, जवान योगेश घुनावत, श्रावण खरात, किसन सुंदर्डे यांनी केली.
सैन्य दलातील हवालदार रॅकच्या जवानाला आर्मी कॅन्टीनमधून दरमहा ५ मद्याच्या बाटल्या मिळतात. त्यामुळे आरोपीने कँटीनमधील कडक सुरक्षा आणि नियम डावलून इतक्या मोठ्या प्रमाणावर महागड्या व उच्चप्रतीच्या ८३ बाटल्यांचा साठा बाहेर आणला कसा ? किती दिवसांपासून बाटल्या साठवून विक्री केली जात होती? यात इतर कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास अधिकारी करत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
५० टक्के सवलतीचा मद्यसाठा, ३० टक्के नफ्याने विक्री
सैन्य दलातील जवानांना त्यांच्या ठराविक कोट्यानुसार हे मद्य खुल्या बाजारातील दरापेक्षा सुमारे ५० टक्के कमी दराने उपलब्ध होते. हे महा सर्वसामान्यांना मिळत नसल्याने शौकिनां-कडून याला मोठी मागणी असते. या मागणीचा गैरफायदा घेत छावणी येथे सैन्य दलात हवालदार म्हणून कार्यरत असलेला आरोपी संताराम पदातुरे याने मद्याच्या बाटल्या जमा केल्या आणि त्यावर २० ते ३० टक्के जास्तीचे मार्जिन ठेवून चढ्या भावाने बाहेरगावी विक्री करत असल्याचे सूत्रांनी सांगितले.