

Severe water shortage in Vakdi village; officials, including the administrator, turn a blind eye
आन्वा, पुढारी वृत्तसेवाः भोकरदन तालुक्यात यावर्षी भीषण दुष्काळ पडला असून दुष्काळामुळे वाकडी गावातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. यामुळे गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागणार असल्याचे चित्र आहे. वाकडी गावातील मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेचे काम निकृष्ट झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
भोकरदन तालुक्यातील वाकडी गावाची लोकसंख्या जवळपास पाच हजार आहे. तीस वर्षांनंतर या गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी २०१८ मध्ये १ कोटी २२ लक्ष रूपयांच्या मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळाली. मात्र, आजपर्यंत ही योजना पूर्णत्वास गेली नाही. दर महिन्यात तीन ते चार वेळेस या योजनेची पाईपलाईन फुटत असल्याने गावाला होणारा पाणीपुरवठा पंधरा दिवसांपासून बंद आहे.
मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना कुचकामी ठरल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. भोकरदन तालुक्यातील जुई धरण प्रकल्प कोरडेठाक पडल्याने पाणी टंचाईची दाहकता वाढली आहे. पावसाने मोठा खंड दिल्याने व मोठे पाऊस झाले नसल्याने जुई धरणासह व सार्वजनिक विहिरीत पाणी साठा उपलब्ध नाही.
यामुळे नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे गावाला योजनेद्वारे पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने ऐन हिवाळ्यात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करून खाजगी विहिरीचा आधार घेऊन तहान भागवावी लागत आहे. पाणी टंचाईमुळे ग्रामस्थ धास्तावले आहेत.
योजनेचा बट्ट्याबोळ, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
ग्रामपंचायत वतीने पुन्हा नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम चालू असून पूर्वीची पाईपलाईन अतिशय निकृष्ट दर्जेची करण्यात आली असल्यामुळे या योजनेचा दोन वर्षांत बट्ट्याबोळ झाला आहे. सध्या वाकडी ग्रामपंचायतींवर प्रशासक राज सुरू आहे. प्रशासक अधिकाऱ्याचे ग्रामस्थांच्या प्रश्नाकडे होत आहे. त्यामुळे येथील नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहेत.