

जालना : शहरातील नवीन मोंढा परिसरात व्यापाऱ्याची पैशांनी भरलेली बॅग चाकूचा धाक दाखवून हिसकावून नेणाऱ्या चौघा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या एका दिवसात जेरबंद केले. आरोपींकडून रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल, चार मोबाईल व चाकूसह ५ लाख ७२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५जुलै रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास नवीन मोंढा परिसरात व्यापारी उमेश मधुसूदन बजाज हे ४ लाख ९६ हजारांची रोकड असलेली बॅग घेऊन जात असताना तिघा अनोळखी इसमांनी त्यांना चाकूचा धाक दाखवत बॅग हिसकावून मोटारसायकलवरून पलायन केले.
या प्रकरणी १६ जुलै रोजी चंदनझिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गंभीर गुन्ह्याचा तपास करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक तेघवीरसिंह संधू यांनी दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे चौघा संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अयान ऊर्फ पंच्यानव अमजद अली (हिंद नगर,जालना), शेख उमर शेख रहीम (गुंडेवाडी ता,जालना), शेख अब्दुल शाहिद ऊर्फ मीटर शेख रशीद (हिंद नगर) आणि आरिफ रहीमोद्दीन अन्सारी (हिंदनगर) यांचा समावेश आहे.
आरोपींकडून ४ लाख ८१ हजार ५०० रुपयांची रोकड, ५० हजार किमतीची हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल, ४० हजार किमतीचे चार मोबाईल आणि एक चाकू असा ५ लाख ७२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या कारवाईमुळे व्यापाऱ्यांची लूट करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला असून, स्थानिक गुन्हे शाखेच्या तातडीच्या तपासाचे जिल्ह्यात कौतुक होत आहे.
सदर कारवाई पोलिस अधीक्षक तेघवीर सिंह संधू,अपर पोलिस अधीक्षक विक्रम साळी,उपविभागीय पोलिस अधिकारी (जालना उपविभाग) अनंत कुलकर्णी,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव, सपोनि. सचिन खामगळ,पोउपनि. राजेंद्र वाघ,पोलिस अंमलदार गोपाल गोशिक, रमेश राठोड, प्रभाकर वाघ, सागर बाविस्कर लक्ष्मीकांत ओडेप, दत्ता वाघंडे, इरशाद पटेल, संदीप चिंचोले, शिवप्रसाद एखंडे, रमेश काळे,कैलास चेके,योगेश सहाणे,सुनील पवार यांनी केली.