

नंदुरबार : नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मोटारसायकल चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करत तिघा आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून सुमारे 30 लाख 30 हजार रुपये किमतीच्या 32 चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे नंदुरबार, नाशिकसह गुजरात आणि मध्यप्रदेशातील एकूण 19 मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांची उकल झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांच्या निदर्शनास आले होते. त्यांनी या गुन्ह्यांचा गांभीर्याने तपास करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी जिल्ह्यातील चोरीच्या घटनांचा सखोल अभ्यास करून चोरीची ठिकाणे, वेळा, पद्धती आणि लक्ष्य केले जाणारे वाहनांचे प्रकार यांचे विश्लेषण केले.
तपासादरम्यान पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, दोन संशयित म्हसावद येथील चिखली फाट्यावर चोरीची काळ्या रंगाची स्प्लेंडर मोटारसायकल विक्रीसाठी आणणार आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून बलवान ऊर्फ अजय ज्ञानेश्वर खर्डे (वय 29, रा. अंबापूर, ता. शहादा) आणि हिम्मतसिंग सत्तरसिंग पावरा (वय 29, रा. पावरा कॉलनी, म्हसावद, ता. शहादा) या दोघांना ताब्यात घेतले.
चौकशीत त्यांनी त्यांचा साथीदार रिजवान दगडू तेली (वय 29, रा. कुबेर नगर, म्हसावद) याच्या मदतीने खेडकोचरा माता मंदिर परिसरातून सुमारे दोन महिन्यांपूर्वी मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. या प्रकरणी धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 238/2026 दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी रिजवान तेली यालाही ताब्यात घेतले.
तिघांची सखोल चौकशी केल्यानंतर त्यांनी नंदुरबार, नाशिक जिल्ह्यासह गुजरात आणि मध्यप्रदेशातून मोटारसायकली चोरी केल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी विविध ठिकाणी छापे टाकून आरोपींनी नातेवाईक, मित्र आणि परिचितांकडे लपवून ठेवलेल्या 32 चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या. या वाहनांची एकूण किंमत 30 लाख 30 हजार रुपये असून, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ती पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
या कारवाईमुळे नंदुरबार, नाशिक तसेच गुजरात आणि मध्यप्रदेशातील एकूण 19 मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांची उकल झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.