

Electricity bills worth 147 crore rupees have not been paid
जालना, पुढारी वृत्तसेवा जालना मंडळातील १ लाख ३३ हजार १०३ विज ग्राहकांकडे १४७ कोटी ३९ लाख रुपयांची थकवाकी आहे. यात अनेक ग्राहकांनी काही दिवसांपासून एक रुपयाचाही भरणा केलेला नाही. यामुळे वीजबिल थकबाकीचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभुमीवर महावितरणने थकबाकीदारांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
वीजबिल न भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची 'मिशन नाइन्टी डेज ही मोहीम महावितरणने नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसांपासून सुरू केली आहे. आर्थिक वर्ष संपेपर्यंत आगामी ९० दिवस चालणाऱ्या या मोहिमेत वीजबिल वसुलीबरोबरच वीजचोरांवरही धडक कारवाई केली जाणार आहे.
जालना मंडळातील १ लाख ३३ हजार १०३ विज ग्राहकांकडे १४७ कोटी ३९ लाख रुपयांची थकबाकी आहे. विज बील वसुलीसाठी महावितरणने थकबाकीदारांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला आहे. बिल भरण्यास प्रतिसाद न देणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा डिसेंबर महिन्यात खंडित करण्यात आला.
आता या कारवाईची व्याप्ती अधिक वाढवण्यात येणार आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच (१ जानेवारी) 'मिशन नाइन्टी डेज' मोहिमेंतर्गत वीजबिल वसुली व थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यास सुरुवात झाली आहे. या मोहिमेत अभियंता व तांत्रिक कर्मचाऱ्यांसह परिमंडलातील विविध कार्यालयांत कार्यरत अधिकारी व कर्मचारीही तैनात करण्यात आले आहेत. मुख्य अभियंता पवपनकुमार कछोट यांच्यासह सर्व अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते, उपविभागीय अभियंते, शाखा अभियंते, कार्यालयीन अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला आहे.
थकबाकी वसुली करताना काही संवेदनशील भागांत कर्मचाऱ्यांना विरोध होण्याची शक्यता लक्षात घेता, ही कारवाई पोलिस बंदोबस्तात केली जाणार आहे. कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी न पडता ही मोहीम अधिक गतिमान केली जाणार असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. तसेच महावितरण कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, मारहाण करणाऱ्यांवर पोलिसांत गुन्हा दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.
५ जानेवारीला मेळावा
वीजबिलासंबंधित तक्रार असणाऱ्या ग्राहकांसाठी ५ जानेवारी रोजी सर्व उपविभाग कार्यालयांत वीजबिल दुरुस्ती मेळाच्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्रूटी असलेल्या बिलांची दुरुस्ती केली जाईल. ग्राहकांनी मेळाव्याचा लाभ घेऊन वीजबिल दुरुस्ती व बिलांसंबंधीच्या इतर तक्रारींचे निराकरण करून घ्यावे असे अवाहन करण्यात आले आहे.
थकबाकीदार शेजाऱ्यांना वीज देणे पडेल महागात
थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित केल्यानंतर काहीजण शेजाऱ्यांकडून वीजपुरवठा घेतात. परंतु हे बेकायदेशीर आहे. असे प्रकार आढळल्यास संबंधितांवर वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे तसेच अनधिकृत वीज देणाऱ्या शेजाऱ्याचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. एखाद्या ठिकाणचा वीजपुरवठा खंडित केल्यानंतर संबंधित ग्राहकाचे शहरात जिथे दुसरे कनेक्शन असल्यास त्यावर थकबाकी वळवली जाणार आहे.