

E-bus journey stopped in Jalna due to lack of recruitment of driver-conductor
जालना, पुढारी वृत्तसेवा राज्य परिवहन महामंडळाच्या जालना विभागात २०१९ पासून चालक व वाहकांची भरती झालेली नसल्याने जालना विभागात ई-बसचा प्रवास लांबला आहे. सध्या जालना आगारात ४८९ चालक व ३३६ वाहक असून नवीन बसेस आल्यास भरती नसल्याने चालक व वाहक आणायचे कोठून असा प्रश्न एसटी प्रशासनासमोर आहे.
जालना एसटी विभागात जालना, परतूर, जाफराबाद व अंबड असे चार आगार आहेत. या चार आगारात २७२ बसेस आहेत. त्यात मानव विकासच्या जुन्या ५६ तर नव्याने आलेल्या ३८ बसेस आहेत. बीएस-६ च्या नव्याने २० बसेस दाखल झाल्या आहेत. एसटीच्या ताफ्यात बसेसची संख्या वाढत असतानाच दुसरीकडे चालक व वाहकांची संख्या अपुरी पडत असल्याने प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.
येत्या काही वर्षांमध्ये निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या लक्षणीय असल्याने नव्या बसेस चालवण्यासाठी चालक तथा वाहक या पदासह अन्य कर्मचारी व अधिकाऱ्यांची भरती होणे आवश्यक आहे. एसटीचे चालक व वाहक रात्री बस घेऊन इतर आगारात गेल्यानंतर तेथे त्यांच्या राहण्याची व्यवस्थाही चांगली नसल्याने चालक व वाहकांची व्यवस्थित झोप होत नाही. त्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशीचा प्रवास सुरू होत असल्याने एसटी प्रशासनाने याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.
जालना विभागात ई-बसेस २०२३ च्या मे महिन्यातच सुरू होणे अपेक्षित होते. मात्र अपुऱ्या चालक व वाहकांच्या समस्येमुळे एसटीच्या चारही आगारांत ई-बसेस दाखल झालेल्या नाहीत. जालना विभागात छत्रपती संभाजीनगरसह इतर विभागातील ई-बसेस ये-जा करतात. ही बस वातानुकूलित व ध्वनिप्रदूषण करणारी नसल्याने प्रवाशांच्या पसंतीस उतरली आहे. मात्र जालना विभागात एकही ई-बस नसल्याने नाईलाजाने प्रवाशांना इतर आगारातून ये-जा करणाऱ्या ई-बसला पसंती द्यावी लागत आहे.
जालना विभागात एसटी महामंडळाच्यावतीने ई-बस येण्यापूर्वी जालना, परतूर, जाफराबाद व अंबड या चारही आगारात ई- बस चार्जिंगसाठी स्टेशन उभे करण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. एका आगारात या चार्जिंग स्टेशनवर २५ बसेस चार्जिंग होणार आहेत. एका चार्जमधे ई-बस साधारण तीनशे किलोमीटर धावणार आहे.