

पांगरी : मंठा तालुक्यातील वाई परिसरातील शेतकऱ्यांनी कोरा सातबारा असलेल्या खातेदारांना तात्काळ पीक कर्ज द्यावे, अशी जोरदार मागणी केली आहे. हे शेतकरी महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वाटूर फाटा शाखेचे खातेदार असून, ही शाखा त्यांच्यासाठी दत्तक शाखा म्हणून कार्यरत आहे.
सध्या या बँकेत जुने पीक कर्ज नव्याने सुरू करण्याची प्रक्रिया सुरू आहे, त्यामध्ये काही खातेदारांना व्याज सवलतीसह खाती नवे करण्यात येत आहेत. मात्र, ज्यांचा सातबारा कोरा आहे, कोणत्याही बँकेचे कर्ज बोजा नाही, अशा शेतकऱ्यांना मात्र बँकेकडून वारंवार वेळ दिला जात आहे.
"ऑगस्ट अखेरीस या किंवा सप्टेंबरमध्ये या", असे सांगून शेतकऱ्यांना परत पाठवले जात आहे. दरम्यान, रब्बी नक्षत्र सुरू होत असताना शेतकऱ्यांना खते, औषधे, बियाणे खरेदीसह मुलांच्या शिक्षणासाठी पैशाची तातडीची गरज आहे. त्यामुळे हे शेतकरी बँकेत रोज चकरा मारताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर वाई परिसरातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी जालना यांनी याची तातडीने दखल घ्यावी आणि कोरा सातबारा असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ पीक कर्ज वाटपाच्या सूचना बँक व्यवस्थापकांना द्याव्यात, अशी मागणी केली आहे.