

Diesel theft from vehicle exposed on Samruddhi Highway
जालना, पुढारी वृत्तसेवाः मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गवरील तालुक्यातील निधोना शिवारात उभ्या असलेल्या ट्रकची डिझेल टाकी फोडून त्यातील डिझेल चोरल्यानंतर चोरट्यांनी कारमधे डिझेल भरलेल्या कॅन टाकून गुंडेवाडीकडे पळ काढला. तेथे एका ट्रक चालकाच्या ट्रकमधून डिझेल चोरी करीत असतानाच पोलिसांना पाहून चार चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत कार व डिझेलच्या कॅन सोडून पळ काढला. पोलिसांच्या या कारवाईत दोन लाख १८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मुंबई-नागपूर समृध्दी महामार्गावरील निधोना शिवारात ट्रक (क्रमांक टीजी-०७-७३१३) चा ट्रकचालक योगेंद्र लक्ष्णमसिंह चव्हाण हा ट्रक उभी करुन तो ट्रकमधे झोपला असता पहाटे साडेचार वाजेच्या दरम्यान मारुती सुझुकी (कार क्रमांक एम एच ०४ जीबी २०७०) मधून आलेल्या अनोळखी चार इसमांनी ट्रक चालकाच्या वाहनातील डिझेल टैंक फोडून डिझेल चोरी करण्यास सुरुवात केली.
यावेळी चालकाच्या लक्षात डिझेल चोरी होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने चोरट्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी ट्रकचालकाला जीवे मारण्याची धमकी देऊन त्याच्याकडील रोख तीन हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर कार घेऊन चोरटे नागपूरच्या दिशेने पळून जात असताना ट्रकचालकाने त्यांचा गुंडीवाडी पेट्रोल पंपापर्यंत पाठलाग केला.
तेथे चोरटे शिवम तिवारी नावाच्या चालकाच्या ट्रकमधून डिझेल काढण्याचा प्रयत्न करीत असताना महामार्ग पोलिसांच्या सदर प्रकार निदर्शनास आला. त्यांनी त्यांचे ताब्यातील कार (क्रमांक एम एच झिरो फोर जीबी २० ७०) व त्यामध्ये असलेले चोरीचे डिझेल सोडून अंधाराचा फायदा घेऊन पळ काढला. चालक योगेंद्र लक्ष्मण सिंह चव्हाण यांना सोबत घेऊन पोलिस ठाणे चंदनझिरा येथे तक्रार नोंदवली. कारमध्ये प्लास्टिक कॅन मिळून आल्या. त्यामध्ये तीन कॅनमध्ये अंदाजे १०० ते १०५ आली.
लिटर डिझेल होते. आठपैकी पाच कॅन रिकाम्या आढळून आल्या. कारच्या सीटवर रेडमी कंपनीचा एक मोबाईल हँडसेट व लोखंडी तलवार आढळून आली.
मुंबई-नागपूर समृध्दी महामार्गावर जालना तालुक्यात ट्रक चालकांच्या डिझेल टाकीतून मोठ्या प्रमाणात डिझेल चोरीच्या घटना घडत असल्याने ट्रक चालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांच्या कारवाईत मुद्देमाल मिळत असला तरी आरोपी पळून जात असल्याने गुन्ह्याचे सत्र थांबत नसल्याचे दिसत आहे.