

Former MLA Kailash Gorantyal joins BJP
जालना, पुढारी वृत्तसेवाः काँग्रेसचे माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी माजी नगराध्यक्ष, माजी नगरसेवक, जि.प.व पं.स.चे माजी सदस्यांसह भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.
यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष चव्हाण म्हणाले की, माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्यासारखा जमिनीवरचा नेता भाजपात प्रवेश करत असल्याने निश्चितच आनंद होत आहे. त्यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांच्या विश्वासाला तडा देणार नाही. यावेळी जालना विधानसभा मतदार संघाचे मा. आमदार कैलास गोरंट्याल यांच्यासह माजी नगराध्यक्षा संगीताताई गोरंट्याल, युवा नेते अक्षय गोरंट्याल, काँग्रेस पक्षाचे शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते तसेच शिवसेना उबाठा, शिवसेना शिंदे गट यांच्यासह अन्य पक्षातील पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथील भाजपा प्रदेश कार्यालयात भाजपामध्ये प्रवेश केला.
याप्रसंगी राज्याचे माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, मंत्री अतुल सावे, माजी मंत्री आ. बबनराव लोणीकर, भाजपाचे जालना जिल्हाध्यक्ष आ. नारायण कुचे, आ. संतोष दानवे, आ. संजय केनेकर, भाजपा जालना महानगर अध्यक्ष भास्करराव दानवे, अशोक पांगारकर, भाजपाचे प्रदेश सरचिटणीस राहुल लोणीकर, माजी नगराध्यक्ष राजेश राऊत, सिद्धिविनायक मुळे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा संध्याताई देठे यांच्यासह इतरांची प्रमुख उपस्थिती होती.
भाजपात प्रवेश करायचं ठरल होत. परंतु मुहूर्त लागत नव्हता असे सांगून माजी आमदार कैलास गोरंट्याल म्हणाले की, आपले काका स्व. व्यंकटेश गोरंट्याल हे मराठवाडा विभागात जालन्याचे पहिले नगराध्यक्ष झाले होते याची आठवण करून देत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जालना महानगरपालिकेचा पहिला महापौर हा भाजपाचा होईल, असा विश्वास गोरंट्याल यांनी यावेळी व्यक्त केला. कोणत्याही अटी न ठेवता आपण भाजपामध्ये प्रवेश करत असून उर्वरित काळ आता आपण भाजपामध्येच घालवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.