

Wells were damaged by heavy rains in Ashti, despite heavy rains three times, there are no Panchnamas
परतूर आष्टी, पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील आष्टी मंडळ व परिसरात तीन वेळेस अतिवृष्टीची नोंद झाली आहे. गोळेगाव येथे विहिरी खचल्या असून अनेक शेतातील साचलेले पाणी शेताबाहेर न गेल्याने पिके धोक्यात आले आहेत. तीन वेळेस अतिवृष्टी होऊनही महसुलच्यावतीने नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात न आल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.
आष्टी परिसरात पडलेल्या जोरदार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुरुवातीला मे महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील पेरण्या काही भागात लवकर झाल्या होत्या. आष्टी मंडळात गेल्या दहा दिवसांत १७ जूलै रोजी ९६.३ मि. मी., २२ रोजी १०९.३ मि. मी, तर २७ जूलै रोजी ६६.५ मि. मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. शासनाच्या वतीने पंचनामे करण्यासाठी पूर्वीच आदेश देण्यात आलेले आहेत.
अतिवृष्टीमुळे जमीनीचे धुरे, बांध फुटून शेतातील सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद अन्य पिके पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. गोळेगाव येथील शेत गट क्र ८१मध्ये अतिवृष्टीमुळे विहिरी खचल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.