

घनसावंगी ः तालुक्यासह ग्रामीण भागात खरीप हंगामाच्या पूर्वतयारीला वेग आला असतानाच डिझेल टंचाईचे संकट निर्माण झाल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. सध्या नांगरणी, कुळवणी, रोटाव्हेटर तसेच पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरू असताना डिझेलचा अपुरा पुरवठा होत असल्याने ट्रॅक्टरची कामे ठप्प पडण्याची वेळ आली आहे. परिणामी अनेक गावांमध्ये मशागतीची कामे रखडल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी शेताची पूर्वतयारी करण्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. बहुतांश शेतकरी मशागतीसाठी ट्रॅक्टरवर अवलंबून असल्याने डिझेलची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र अनेक पेट्रोलपंपांवर डिझेल मर्यादित प्रमाणात उपलब्ध होत असल्याने ट्रॅक्टर चालकांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे.
काही ठिकाणी डिझेल संपल्यामुळे ट्रॅक्टर रिकाम्या हाताने परत पाठविण्याची वेळ येत असल्याने शेतकरी आणि चालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मशागतीची कामे वेळेत पूर्ण न झाल्यास पेरणी उशिरा होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. हवामान विभागाकडून यंदा मान्सून वेळेत दाखल होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून त्यानुसार शेतकऱ्यांनी शेतीची तयारी सुरू केली आहे. मात्र डिझेलअभावी मशागतीचा वेग मंदावल्याने शेतकऱ्यांचे संपूर्ण नियोजन विस्कळीत होत आहे.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी सांगितले की, आधीच शेतीमालाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने आणि उत्पादन खर्च सातत्याने वाढत असल्याने शेती करणे कठीण झाले आहे. त्यात वाढते तापमान, अवकाळी हवामान आणि आता डिझेल टंचाईमुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. वेळेत मशागत न झाल्यास पेरणी उशिरा होऊन उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, काही भागात ट्रॅक्टरच्या भाड्यातही वाढ झाल्याची चर्चा असून त्याचा अतिरिक्त आर्थिक भार शेतकऱ्यांवर पडत आहे. डिझेल टंचाईचा परिणाम केवळ कृषी कामांपुरता मर्यादित नसून मालवाहतूक आणि ग्रामीण भागातील इतर व्यवसायांवरही जाणवत आहे.
खरीप हंगाम तोंडावर असताना निर्माण झालेली ही परिस्थिती गंभीर असून प्रशासनाने तातडीने लक्ष घालून ग्रामीण भागातील पेट्रोलपंपांवर डिझेलचा नियमित व पुरेसा पुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी शेतकरी, ट्रॅक्टर चालक आणि ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
खरीप हंगामासाठी शेताची तयारी सुरू केली आहे. मात्र डिझेल मिळत नसल्यामुळे ट्रॅक्टरची कामे वेळेत होत नाहीत. पेट्रोलपंपावर तासन्तास थांबावे लागत आहे. मान्सून जवळ आला असून मशागत उशिरा झाल्यास पेरणीवर परिणाम होईल. प्रशासनाने तातडीने डिझेलचा पुरवठा सुरळीत करावा.
प्रवीण धांडगे, शेतकरी, राहेरा