Dhangar Reservation Protest | धनगर आरक्षण आंदोलन, जालना जिल्ह्यात संचारबंदी; दीपक बोऱ्हाडे यांना अटक
Deepak Borhade Arrested
जामखेड : धनगर समाजाच्या एस.टी आरक्षण अंमलबजावणीच्या मागणीसाठी दीपक बोऱ्हाडे यांनी पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले आहे. 21 जानेवारी रोजी मुंबईतील आझाद मैदानावर ‘चलो मुंबई’ आंदोलनाची हाक देण्यात आली असून, त्या अनुषंगाने 17 जानेवारी रोजी जालना–अंबड येथून कूच होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर जालना जिल्हा प्रशासनाने तातडीने संचारबंदी लागू केली आहे.
जालना जिल्ह्यात पहाटे पाच वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, आंदोलनाचे नेतृत्व करणारे दीपक बोऱ्हाडे यांना जालना पोलिसांनी अटक केली असून, धनगर समाजातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना प्रतिबंधात्मक नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
या कारवाईच्या निषेधार्थ जामखेड येथे धनगर समाजाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. जामखेड बसस्थानक परिसरातील अहिल्यादेवी होळकर स्मारकासमोर टायर जाळून शासनाचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी “सरकार हमसे डरती है, पोलीस को आगे करती है”, “येळकोट येळकोट जय मल्हार”, “धनगर एस.टी आरक्षण अंमलबजावणी झालीच पाहिजे” या सरकारचे करायचे काय खाली मुंडके वर पाय अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला.
यानंतर आंदोलनकर्त्यांनी दीपक बोऱ्हाडे यांच्या समर्थनार्थ जालना शहराकडे कूच करण्याचा प्रयत्न केला. संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने ठिकठिकाणी बंदोबस्त वाढवून आंदोलनकर्त्यांवर लक्ष ठेवले आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासनाने नागरिकांना कायद्याचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, आंदोलनादरम्यान शासनाच्या भूमिकेविरोधात तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत विविध घोषणा देण्यात आल्या असून, सरकारने धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीकडे गांभीर्याने पाहावे, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली आहे.

