

शरद मुळे
सुखापुरी : धनगर समाजाच्या न्याय्य हक्कासाठी सुरू असलेल्या आंदोलनाची ठिणगी आता गावोगावी पेटू लागली आहे. अंबड तालुक्यातील रुई येथे आज बुधवारी (दि.१०) सकाळी दहाच्या सुमारास धनगर बांधवांनी अंबड–तीर्थपुरी मार्गावर टायर जाळून रस्तारोको करत सरकारविरोधात संतप्त घोषणाबाजी केली. तब्बल तासभर रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
धनगर समाजाला एसटी प्रवर्गात अंमलबजावणीची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. "सरकार फक्त आश्वासनांचीच भुलथाप देत आहे, पण प्रत्यक्ष कृती शून्य आहे," असा जाहीर रोष आंदोलनात व्यक्त करण्यात आला. जालना येथे उपोषण करणारे दिपक बोऱ्हाडे यांनी पंधरा दिवसांपासून अन्नत्याग केला असून त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. "आमच्या तरुणांचे प्राण धोक्यात घालूनसुद्धा शासन कानाडोळा का करत आहे?" असा संतप्त सवाल आंदोलनकर्त्यांनी केला.
आंदोलनादरम्यान रुई गावासह परिसरातील अनेक गावांतील धनगर बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. "धनगर समाजाची ST प्रवर्गातील अंमलबजावणी झालीच पाहिजे, अन्यथा लढा आणखी तीव्र केला जाईल," अशा घोषणा देत परिसर दणाणून गेला. संतप्त जनतेने आंदोलन संपवताना तीर्थपुरी पोलीस स्टेशनचे बिट जमादार भगवान शिंदे व अनिल मुसळे यांना निवेदन सादर केले. त्यानंतर रस्ता पुन्हा सुरळीत करण्यात आला.
धनगर समाजाच्या डोळ्यांत आज असहायता होती, पण त्याचबरोबर निर्धाराची ठिणगीही होती. "शासनाने आता विलंब न करता ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा हा लढा जनआंदोलनाच्या वादळात परिवर्तित होईल," असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.यावेळी हरीभाऊ चौरे,सुनिल मुसळे,भागवत मुसळे,सुरेश महानोर,सिंद्धैशवर वैद्य अशोक शेळके, विठ्ठल साळे बाबासाहेब मुळे सुरेश मुसळे आनंद मगरे मुक्ताराम घोलपसह आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.