

Delay in housing scheme installments; a unique protest
जालना, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील घरकुल लाभार्थ्यांना पहिला व दुसरा हप्ता मिळण्यात होत असलेल्या विलंबाविरोधात वंचित बहुजनच्या वतीने लिंबाचे डगळे देऊन मंगळवारी अनोखे आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
एक वर्ष उलटूनही अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात घरकुलाचा हप्ता जमा न झाल्याने संतप्त झालेल्या आंदोलनकर्त्यांनी प्रकल्प अधिकारी सुनील पठारे यांची भेट घेत त्यांना लिंबाचे डगळे देत झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला.
वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते तथा माळशेंद्राचे सरपंच विजय लहाने यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते आर. आर. पाटोळे, अंकुश गाडेकर, सुनील लोखंडे, अनिल साठे यांच्यासह मोठ्या संख्येने घरकुल लाभार्थी उपस्थित होते.
आंदोलनकर्त्यांनी प्रकल्प अधिकारी यांना निवेदन देऊन लाभार्थ्यांच्या खात्यात तातडीने घरकुलाचे प्रलंबित हप्ते जमा करण्याची मागणी केली. यावर येत्या सात दिवसांत आवश्यक कार्यवाही करून लाभार्थ्यांच्या खात्यात हप्त्याची रक्कम जमा करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन प्रकल्प अधिकारी सुनील पठाडे यांनी दिले.