

Court rejects Santosh Khandekar's bail application again
जालना, पुढारी वृत्तसेवाः जालना मनपाचे लाचखोर आयुक्त संतोष खांडेकर यांचा जिल्हा व सत्र न्यायालयाने पुन्हा सोमवार दि. १० रोजी जामिन अर्ज फेटाळला आहे. यामुळे खांडेकर यांचा कारागृतील मुक्काम आणखी वाढला आहे. दरम्यान, त्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी तीन वेळा लांबली होती.
लाचखोर आयुक्त संतोष खांडेकर यांच्या जामिन अर्ज न्यायालयाने फेटाळल्यामुळे खांडेकर यांचा कारागृहातील मुक्काम किमान १५ दिवस लांबू शकतो, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, यापुर्वी जालना महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक संतोष खांडेकर यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर जिल्हा व सत्र न्यायालयात शनिवारी (दि. १) रोजी सुनावणी होणार होती. मात्र, आरोपीच्या वकिलाने वेळ मागितल्याने ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली.
पुन्हा सोमवार (दि. ३) रोजी होणारी सुनावणी पुन्हा दोन दिवसांनी पुढे ढकलण्यात आली होती. ती सुनावणी बुधवार दि. ५ रोजी होणार होती. मात्र, काही कारणास्तव या दिवशी सुनावणी होऊ शकली नाही. आज सोमवार दि. १० रोजी न्यायालयात खांडेकर यांनी दाखल केलेला जामिन अर्ज फेटाळण्यात आला आहे.
यापुर्वी त्यांनी उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंड पीठात जामीनीसंदर्भात अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांनी तो पुन्हा मागे घेवून मी आता आयुक्त पदावर राहिलो नाही, म्हणून कोणावरही दबाव आणणार नाही, असे नमूद करुन जालना जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज सादर केला होता.
सोमवारी न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. यामुळे खांडेकरांच्या कारागृहातील मुक्काम लांबला आहे. दरम्यान, संतोष खांडेकर यांनी लेबर कॉन्ट्रॅक्टरकडून दहा लाखांची लाच स्वीकारली होती. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने १७ ऑक्टोबर रोजी रात्री कारवाई करून खांडेकर यांना रंगेहात पकडले होते. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक बाळू जाधवर यांच्या फिर्यादीवरून कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.