

'OBC' brothers are in trouble, not religion: Prakash Ambedkar
जालना, पुढारी वृत्तसेवा : आज धर्म नव्हे तर ओबीसी संकटात सापडला आहे, ओबीसी समाजाने आता जागृत होऊन आरक्षण विर-ोधकांना मतदान करू नये, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवार (दि.१०) रोजी येथे केले.
सकल ओवीसी व भटके विमुक्त महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चानंतर आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी ओबीसी नेते नवनाथ वाघमारे, प्रदीप बांगर, शंकर लिंगे, वंचित बहुजन आघाडीच्या जालना जिल्हा समन्वयक सौ, सविताताई मुंढे, बळीराम खटके, वंचित बहुजन आघाडीचे जालना जिल्हाध्यक्ष (पश्चिम) डेव्हिड घुमारे, पूर्वचे जिल्हाध्यक्ष रामप्रसाद थोरात, जिल्हा महासचिव प्रशांत कसबे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष रमाबाई होर्शिल आदींची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना अॅड. आंबेडकर पुढे म्हणाले की, आपल्या मुख्यमंत्रिपदाची खुर्ची वाचवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी २ सप्टेंबर रोजी हैदराबाद गॅझेटबाबतचा अध्यादेश काढला, या अध्यादेशामुळे खऱ्या ओबीसी समाजाचे अस्तित्व संपुष्टात येणार आहे. ओबीसीचे मंत्री, लोकप्रतिनिधींना कठपुतळी सारखे नाचवले जात आहे, ओबीसी मंत्री व लोकप्रतिनिधींच्या नाड्या ह्या तिसऱ्या कुणाच्या तरी हातात आहे. ओबीसी मंत्री व नेते मंडळींनी अस्तित्व संपुष्टात येण्याच्या मार्गावर असलेल्या ओबीसी समाजासाठी आता पुढाकार घेतला पाहिजे.
धर्म संकटात नाही तर ओबीसी संकटात सापडला आहे. ओबीसी समाजाने जागृत होऊन येणाऱ्या निवडणुकीत आरक्षणविरोधकांना मतदान करू नये तसेच मला सत्ताध ारी व्हायचे आहे, अशी खूणगाठ बांधावी, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी समाजाने आपले उमेदवार उभे करावेत, असे आवाहनही अॅड. आंबेडकर यांनी यावेळी केले. बिहार राज्यातील विधानसभा निवडणुका संपल्यावर भाजप पाकिस्तान सोबत युध्द करून नवीन फंडा उभा करणार असल्याचे भाकितही त्यांनी केले.
यावेळी प्रदीप बांगर, सविता मुंढे यांनी ओबीसी समाजाने जागृत होऊन आरक्षणवादी उमेदवारांना येणाऱ्या निवडणुकीत मतदान करावे, असे आवाहन केले. डेव्हिड घुमारे यांनी जालना जिल्ह्यातील ओबीसी व भटक्या विमुक्त समाज घटकांनी आपल्या न्याय हक्कांसाठी अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीशी राहावे, असे आवाहन केले. रामप्रसाद थोरात यांनी प्रास्ताविक केले. सभेचे सूत्रसंचालन सकल ओबीसी व भटक्या विमुक्त महासंघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वांजळे यांनी तर हरेश रत्नपारखे यांनी आभार मानले. दरम्यान, ओबीसी व भटक्या विमुक्तांच्या मागण्यासाठी गांधी चमनवरून निघालेल्या मोर्चाचे नेतृत्व अॅड. प्रकाश आंबेडकर, नवनाथ वाघमारे यांनी केले. अंबड चौफुलीवर आयोजित सभास्थळी तहसीलदार छाया पवार यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची टीका
ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी मनोज जरांगे तसेच शरद पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जरांगे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून ओबीसी समाजाचे अस्तित्व संपवित असल्याचा आरोपही केला. ओबीसी समाजाने आरक्षण विरोधकांना मतदान करू नये, ओबीसी समाजाने खुल्या प्रवर्गातून निवडणूक लढण्यासाठी दंड ठोपठावे, असे आवाहनही केले.