

Complete the road work; Villagers reached Mini Mantralaya
जालना, पुढारी वृत्तसेवा :
गावातील रस्त्याचे काम अर्धवट सोडून ठेकेदाराने पूर्ण कामाचे बिल उचलून घेतल्याचा प्रकार जालना तालुक्यातील हस्ते पिंपळगाव येथे उघडकीस आला आहे. रस्त्याचे काम पूर्ण करावे, या मागणीसाठी ग्रामस्थांनी जिल्हा परिषद कचेरी काढून मुख्य कार्यकारी अधिका-यांसमोर रस्त्याअभावी होणारी कैफियत मांडली.
जालना तालुक्यातील हस्ते पिंपळगाव येथे जालना जिल्हा परिषद अंतर्गत सुधारणा मंजुरीतून हस्ते पिंपळगाव ते शेवगा रस्त्याचे काम दोन वर्षांपूर्वी मंजूर झाले होते. रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराने काम अर्धवट सोडून पूर्ण काम केल्याचे बिल उचलले असल्याची तक्रार केशव अंबादास शिंदे व ग्रामस्थांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय आयुक्त यांच्याकडे केली होती.
२६ मे २०२३ रोजी तलाठी व मंडळाधिकाऱ्यांनी अर्धवट कामाचा पंचनामा केला. रस्ता अर्धवट व नाली बांधकाम न झाल्याने ग्रामस्थांना येण्या जाण्यासाठी त्रास होत असल्याची तक्रार घेऊन केशव शिंदे, गजानन नानोटे यांच्या नेतृत्वाखाली महिला पुरुष मंडळींनी थेट जिल्हा परिषद कचेरी गाठली. मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश मिनियार हे परगावी असल्याने या ग्रामस्थांनी उपलब्धप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तुबाकले यांची भेट घेऊन त्यांच्या समोर रस्त्याची कैफियत मांडली.
तुबाकले यांनी हे प्रकरण तातडीने बांधकाम विभागाकडे चौकशीसाठी पाठविण्याचे आश्वासन दिले. यावेळी ग्रामस्थांनी निवेदन सादर करून अर्धवट रस्त्याचे काम पूर्ण करा, अर्धवट काम करणाऱ्या ठेकेदाराविर- ोधात कारवाई करावी, नसता ९ जून पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसण्याचा इशाराही या निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी ग्रामस्थ बामन किटाळे, बाबासाहेब किटाळे, मुक्ताबाई नानोटे, शोभा शिंदे, मदन नानोटे उपस्थित होते.