

Cold wave intensifies in Jafrabad taluka
जाफराबाद, पुढारी वृत्तसेवा :
तालुक्यात चार पाच दिवसांपास थंड वाऱ्यात वाढ झाल्याने गारवा वाढला आहे. नागरिकांना आता बोचऱ्या थंडीला समोर जावे लागत आहे. ही थंडी रब्बी हंगामातील पिकांसाठी पोषक ठरत आहे. चौका-चौकात शेकोट्या पेटल्या असल्याचे दिसून येत आहे.
जाफराबाद तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून अचानक थंडीत वाढ झाली आहे. अगदी - पहाटेपासूनच थंडीला सुरुवात होत आहे. या अचानक थंडीत वाढ झाल्याने लोकांना बोचऱ्या थंडीला समोर जावे लागत आहे. सायंकाळी सहानंतर तर हवेत गारवा निर्माण होण्यास सुरुवात होत आहे. तालुक्यात भरपूर पाऊस झाल्याने अद्यापही सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे. त्यामुळे ही थंडी मोठ्या प्रमाणात जाणवू लागली आहे.
या बोचऱ्या थंडीमुळे नागरिकांना तसेच सकाळच्या सुमारास व्यायामासाठी बाहेर पडणाऱ्यांना कठीण होत आहे. त्यामुळे बाहेर पडताना कानटोपी, स्वेटर, मफलेर, हातमोजे, शाली यांसारख्या उबदार कपड्याचा आधार घ्यावा लागत आहे. या थंडीमुळे सकाळी लवकर व संध्याकाळ नंतर बाहेर पडणाऱ्यांची संख्या चांगलीच रोडावली आहे. अगदी सायंकाळी नंतर व पहाटे जागोजागी शेकोट्या पेटल्याचे दिसत आहे. ही बोचरी गुलाबी थंडी मात्र रब्बी हंगामासाठी पोषक ठरत असून, या थंडीमुळे परिसरातील शेतात गहू, हरभरा यासारखी पिके पेरणीला सुगीचे दिवस आले आहे.
दिवसा कडाक्याचे ऊन व रात्री थंडी यांसारख्या बदलत्या वातावरणाचा मात्र, मानवी आरोग्यावर मोठा परिणाम होत असून सर्दी, खोकला, ताप व अंगदुखी यांसारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे.