

Jalna Construction of houses stalled due to lack of money
टेंभुर्णी, पुढारी वृत्तसेवा : जाफराबाद तालुक्यात पंचायत समिती कार्यालयात सावळा गोंधळ सुरू आहे. तालुक्यातील घरकुल लाभार्थी त्रस्त झाले आहे. घरकुलांना निधी नसल्याचे कारण पुढे करून तालुक्यामध्ये मंजूर असलेल्या सर्वच घरकुलांचे बांधकाम अनेक महिन्यांपासून रखडले आहे. याचे पंचायत समिती कार्यालयाला न खंत ना खेद आहे.
तालुक्यातील टेंभुर्णी, दहिगाव, डावरगाव देवी, जवखेडा ठेंग, हिवराबळी, टाकळी, वरखेडा वीरो या गावांसाठी असलेला गृहनिर्माण अभियंता शुभम सोळुंके हा गैरव्यवहाराच्या प्रकरणावरून सध्या निलंबित आहे. यामुळे या गावातील घरकुलाचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याने घरकुलधारक लाभार्थ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे.
तालुक्यात १६ हजार घरकुल मंजूर आहे. या पैकी १५ हजार १४० घरकुलांना पहिला हप्ता म्हणून १५ हजार रुपये देण्यात आले आहे. उर्वरित ८६० घरकुल लाभार्थी वंचित आहेत. १५ हजार रुपयांचा पहिला हप्ता टाकणे बाकी आहे. तर दुसरा हप्ता १६ हजार घरकुल लाभार्थींपैकी. ७ हजार घरकुल बांधकामधारकांना प्रत्येकी ७० हजार रुपये घरकुल धारकांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहे.
तालुक्यातील सन २०२४ ते २०२५ साठी १६ हजार घरकुल एवढे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पण केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेला घरकुल बांधकामासाठी निधी नसल्याने घरकुलांचे बांधकाम अनेक दिवसांपासून रखडले आहे. वाळू घाट चालू केले नसल्याने घरकुल बांधकाम करण्यासाठी वाळू कोठून आणावी हा प्रश्न घरकुल धारकांना पडला आहे.