

Chilli prices fall, farmers worried
जालना, पुढारी वृत्तसेवा जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी घेतलेल्या उन्हाळी मिरचीला यंदा अपेक्षित दर न मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. सुरुवातीला चांगला भाव मिळाल्यानंतर सततचा पाऊस आणि उत्पादनात झालेली वाढ यामुळे बाजारात दर कोसळले. परिणामी, शेतकऱ्यांना कवडीमोल भावाने मिरची विकावी लागत असून, शेतकऱ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यात मोठ्या प्रमाणात उन्हाळी मिरचीची लागवड केली जाते. यंदा मिरचीला सुरुवातीला चांगला भाव मिळाला. परंतु, सततचा पाऊस आणि उत्पादनात झालेल्या वाढीमुळे शेतकऱ्यांना कवडीमोल भावाने मिरची विक्री करावी लागली. काळी मिरची गेल्या वर्षी ६० रुपये किलोने विकली जात होती, ती यंदा ८० रुपये किलोपर्यंत गेली. मात्र, सध्या ती केवळ २० रुपये किलोने विकली जात आहे. ज्वेलरी, शिमला, बळीराम, पिकेडोर या जातींना देखील मागील वर्षपिक्षा कमी दर मिळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटात अधिकच भर पडली आहे.
यंदा उन्हाळी मिरचीला बाजारपेठेत सुरुवातीला १० ते १२ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला आहे. मात्र, उत्पादनात मोठी वाढ झाल्यानंतर आणि सततच्या पावसामुळे हा भाव खाली आला आहे. त्यामुळे पिकासाठी लावलेला खर्चही वसूल होत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.
सतत पडत असलेल्या पावसामुळे मिरचीवर कोकडा व इतर रोगांचा प्रादुर्भाव वाढला. शेतकऱ्यांना महागडी औषधे फवारावी लागली. पावसाने उघडीप दिल्यानंतर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर मिरचीची तोडणी केली आहे. परिणामी, बाजारपेठेत आवक वाढली असून, भावही कमी झाले आहेत.
बाजारपेठेत व्यापारी शेतकऱ्यांकडून २० रुपये प्रतिकिलो दराने मिरची विकत घेतात. त्यानंतर किरकोळ बाजारात ग्राहकांना ६० रुपये प्रतिकिलोने विक्री केल्या जात आहे.
यंदा दोन एकरांत उन्हाळी मिरचीची लागवड केली आहे. सुरुवातीला चांगला भाव मिळाला. त्यामुळे काही प्रमाणात लावलेला खर्च वसूल झाला आहे.
- भगवान वाघमारे, उत्पादक शेतकरी.
ज्वेलरी - १५ रुपये
शिमला- ०८ रुपये
बळीराम १० रुपये
काळी मिरची -२२ रुपये
पिकेडोर - ८ रुपये