

Child Labor Action Force takes action; 12-year-old boy rescued
जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना शहरातील मोती बाग परिसरातील मराठा नाश्ता सेंटर येथे बालकामगार राबत असल्याचे उघड झाले असून, बालकामगार कृती दलाने सोमवार (दि. १६) रोजी धाड टाकून एका १२ वर्षीय बालकाची सुटका केली. या प्रकरणी हॉटेल मालकाविरुद्ध कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या आदेशानुसार, जालना जिल्ह्यात बालकामगार विरोधी विशेष मोहीम राबवली जात आहे. सोमवारी सकाळी ११.३० च्या सुमारास दुकाने निरीक्षक अमित भिंगारे, सरकारी कामगार अधिकारी अमोल जाधव, दुकाने निरीक्षक विवेक पाटील, चाईल्ड लाईनचे एस. व्ही. दाभाडे, आयएसडब्लू संस्थेचे नितीन जहऱ्हाड, आणि सीएचसी केज वर्कर सुलतान शहा यांच्या पथकाने जुना जालना भागातील संभाजी महाराज उद्यानासमोर असलेल्या मराठा नाश्ता सेंटर येथे तपासणी केली.
चपात्या लाटताना आढळला बालक
या धाडसत्रादरम्यान, अवघ्या १२ वर्षे ११ महिने वयाचा एक बालक तिथे चपात्या लाटण्याचे काम करताना पथकाला आढळून आला. विचारपूस केली असता, तो गेल्या दोन महिन्यांपासून या ठिकाणी कूक (स्वयंपाकी) म्हणून काम करत असल्याचे समोर आले. पथकाने तातडीने या बालकाची मालकाच्या ताब्यातून सुटका केली आणि त्याला महिला व बाल विकास विभागाच्या हवाली केले.