

जालना ः जालना शहरात अल्पवयीन मुलांच्या नावावर चंदा वसुली करून आर्थिक गैरव्यवहार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. यातील नेपाळ, बिहार आणि पश्चिम बंगाल येथील एकूण 13 अल्पवयीन मुलांची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने सुओ-मोटू दाखल केली असून, आरोपी शिक्षकावर कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार या मुलांच्या हक्कांचे उल्लंघन, संभाव्य मानवी तस्करी आणि शोषणाच्या पार्श्वभूमीवर आयोगाने तातडीने कारवाईचे आदेश दिले आहेत. सोमवार, दि. 4 रोजी आयोगाच्या वतीने जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तसेच बाल कल्याण समिती अध्यक्ष यांना पत्र पाठवून सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
जालन्यातील एका मदरसा शिक्षक अब्दुल रऊफ अन्सारी यांनी मुलांकडून चंदा मागूण मोठा गैरव्यवहार केला होता. या संदर्भात मौलाना सय्यद जमिल जानिमिया यांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीनंतर सदर बाजार पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला आहे.
या तपासादरम्यान पोलिसांनी एकूण 13 अल्पवयीन मुलांची सुटका केली असून सध्या त्यांना बाल निरीक्षणगृहात ठेवण्यात आले आहे. सुटका करण्यात आलेल्या मुलांमध्ये नेपाळमधील सहा मुलांचा समावेश असल्याचे समजते. उर्वरित मुले बिहार आणि पश्चिम बंगाल येथील असल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणात बाल तस्करी, बालकामगार, लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा तसेच बाल न्याय अंतर्गत कोणती कारवाई करण्यात आली आहे. तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक बाब समोर आली असून, शहरातील विविध भागात चंदा वसुलीसाठी पेट्या ठेवण्यात आल्याचा आरोप आहे. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी गोळा करण्यात आला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संबंधित ट्रस्ट नोंदणीकृत आहे का, चंदा वसुलीसाठी आवश्यक परवानगी घेण्यात आली होती का, आणि गोळा झालेल्या निधीचा वापर नेमका कशासाठी करण्यात आला, याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे.
सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची चौकशी सखोलपणे सुरू असून सर्व पैलूंवर बारकाईने तपास केला जात आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर दोषींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. या प्रकरणातील तपासातून नेमके कोणते धागेदोरे समोर येतात आणि दोषींवर कितपत कठोर कारवाई होते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
बाल हक्क आयोगाच्या बैठकीत आढावा
दरम्यान, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष ॲड. संजय पुराणिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या प्रकरणाचा आढावा घेण्यात आला. आयोगाचे सदस्य डॉ. संजय लाखेपाटील यांनीही या प्रकरणाची गंभीरता अधोरेखित करत संबंधित यंत्रणांनी तत्काळ आणि प्रभावी कारवाई करणे आवश्यक असल्याचे नमूद केले आहे.
प्रकरणातील संवेदनशीलता लक्षात घेता प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून, अल्पवयीन मुलांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देत पुढील कारवाई केली जात आहे. जिल्हा प्रशासनाकडून या प्रकरणाचा सविस्तर अहवाल मागितला आहे.
डॉ. संजय लाखे, सदस्य, महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोग