Fake police: धुळे-सुरत महामार्गावर तोतया पोलिसांचा पर्दाफाश; नवापूर पोलिसांची तिघांवर कारवाई

पोलीस असल्याचे भासवून वाहनधारकांना अडवून बेकायदेशीर वसुली करणाऱ्या तीन तोतया पोलिसांना नवापूर पोलिसांनी अटक केली
fake police
fake policeFilr Photo
Published on
Updated on

नंदुरबार : पोलीस असल्याचे भासवून वाहनधारकांना अडवून बेकायदेशीर वसुली करणाऱ्या तीन तोतया पोलिसांना नवापूर पोलिसांनी अटक केली. ही कारवाई धुळे-सुरत महामार्गावरील बेडकी चेक नाक्याजवळ करण्यात आली. आरटीओ विभागाच्या नावाखाली वसुली होत असल्याच्या चर्चेमुळे आधीच बदनाम असलेल्या या परिसरात ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

धुळे–सुरत महामार्गावर दर मिनिटाला विविध राज्यांतील मालवाहतूक व प्रवासी वाहने धावत असतात. नवापूर तालुक्यातील विसरवाडी परिसर तसेच गुजरात सीमेवरील बेडकी चेक नाक्याजवळ वाहनधारकांना अडवून बेकायदेशीर रक्कम वसूल केली जात असल्याच्या तक्रारी वर्षानुवर्षे होत आहेत. वाहनधारक संघटनांनी मंत्रालयापर्यंत पाठपुरावा करूनही या प्रकाराला पूर्णविराम मिळालेला नव्हता. अशा पार्श्वभूमीवर २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी झालेली ही कारवाई लक्षवेधी ठरली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेडकी आरटीओ चेक नाक्यापासून काही अंतरावर काही जण पोलीस असल्याचे भासवून वाहनांची तपासणी करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून तपासणी केली असता, हॉटेल देवनारायणजवळ रस्त्यावर इंग्रजीत ‘POLICE’ असे लिहिलेली मारुती सुझुकी कंपनीची पांढऱ्या रंगाची कार उभी करून तीन जण वाहनांची तपासणी करत असल्याचे आढळले. त्यांनी स्वतःला पोलीस अधिकारी असल्याचे सांगत वाहनधारकांकडून वसुली सुरू केली होती.

तत्काळ कारवाई करत पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. सुमारे ५ लाख रुपये किंमतीची संबंधित कार जप्त करण्यात आली. तपासादरम्यान या कारवर बनावट नंबर प्लेट लावण्यात आल्याचे उघड झाले. खरी नंबर प्लेट काढून ठेवण्यात आली होती.

याप्रकरणी नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस नायक बाजीराव विनोद पराडके यांच्या फिर्यादीवरून खुमानसिंग रघुवीरसिंग कुसवा (वय ४२, रा. फुटीकुटी, इंदौर, मध्यप्रदेश), कमल तेजराम चौहान (वय ३३, रा. चांदेल, ता. देपालपूर, जि. इंदौर, मध्यप्रदेश) आणि प्रताप सरदार सिसोदीया (वय ३४, रा. जव्हार टेकडी, इंदौर, मध्यप्रदेश) या तिघांविरुद्ध पोलीस असल्याची बतावणी करून तोतयागिरी व बेकायदेशीर वाहन तपासणी केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास प्रभारी पोलीस उपनिरीक्षक केशव मिठ्या गावीत करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news