

जळगाव :
भुसावळ तालुक्यातील साकरी गावात सोमवारी सकाळच्या सुमारास थरार पाहायला मिळाला. गावात कार का आणली? या क्षुल्लक कारणावरून एका तरुणाला लाकडी दांडके आणि फावड्याच्या दांड्याने बेदम मारहाण करण्यात आली. इतकेच नव्हे, तर या तरुणाची सुटका करण्यासाठी गेलेल्या पोलीस हवालदारावरही संशयितांनी हल्ला चढवला. शासकीय कामात अडथळा आणून पोलिसाचा शर्ट फाडणाऱ्या या ८ गावगुंडांविरुद्ध भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.
नेमकी घटना काय?
तप्तकठोरा येथील रहिवासी सुनील सुरेश तायडे यांचा मुलगा हेमराज हा सोमवारी सकाळी साकरी गावात आपली कार घेऊन आला होता. यावेळी साकरी येथील प्रवीण बाविस्कर यांच्या घरासमोर आरोपींनी 'तू गावात कार घेऊन का आला?' असा जाब विचारत कुरापत काढली. बघता बघता आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून हेमराजला लाकडी दांडके आणि फावड्याच्या दांड्याने बेदम चोप दिला. "तुला विहिरीत फेकून जीव ठार मारू" अशी धमकी देत त्याला लाथाबुक्क्यांनी तुडवण्यात आले.
खाकीवरही हात टाकण्याचे धाडस
हा राडा सुरू असताना भुसावळ तालुका पोलीस ठाण्याचे हवालदार संदीप प्रल्हाद बडगे व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोचले. जखमी मुलाची सुटका करण्यासाठी गेलेल्या बडगे यांच्या अंगावर आरोपी धावून आले. शासकीय कामात अडथळा आणत त्यांनी हवालदाराची गचांडी धरली, त्यांना धक्का-बुक्की केली आणि त्यांच्या वर्दीचे बटणही तोडले. पोलिसांवरच हल्ला झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
यांच्यावर झाला गुन्हा दाखल :
१) प्रवीण जयराम बाविस्कर, २) दिनेश जयराम बाविस्कर, ३) मोहन जयराम बाविस्कर, ४) विकास कौतिक काकडे, ५) सागर प्रभाकर सोनवणे, ६) संजु आत्माराम तोंडे, ७) माधुरी प्रवीण बाविस्कर, ८) सुरेखा मोहन बाविस्कर (सर्व रा. साकरी, ता. भुसावळ).
पोलिसांचा 'ॲक्शन मोड'
याप्रकरणी सुनील तायडे यांच्या फिर्यादीवरून मारहाणीचा, तर हवालदार संदीप बडगे यांच्या फिर्यादीवरून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी (BNS १३१, १२१(१), ३२४(३)) गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक महेश गायकवाड स्वतः या प्रकरणाचा तपास करत असून, कायदा हातात घेणाऱ्या या टोळीची रवानगी आता कोठडीत होणार, हे निश्चित मानले जात आहे.