

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुख्यमंत्री असलो तरी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी काम करत आलो आहे, घरात बसत सोशल मीडियाच्या माध्यमातून काम करण्याची माझी कार्यपद्धती नाही. जनतेत राहून त्याचे प्रश्न कसे सोडवले जातील, यासाठी मी प्रयत्नशील असतो. ज्या ज्या विकासकामांना निधीची गरज भासली त्या त्या वेळी तो निधी आम्ही दिला आहे. महायुतीचे सरकार हे देणारं आहे, घेणारं नाही, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (दि.११) नाव न घेता उद्धव ठाकरेंना लगावला. तसेच महायुती सरकारच्या 'शासन आपल्या दारी' या योजनेचा ५ कोटी लाभार्थ्यांनी लाभ घेतला असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. ते जालना येथील प्रचारसभेत बोलत होते.
तसेच मुख्यमंत्री सहायत्ता निधीतून ८० हजार जणांना मदत केली असून सातत्यानं जनतेचं हित हेच माझं प्राध्यानं राहिलं आहे. जनतेची सेवा हेच माझं परम कर्तव्य आहे. महायुतीचं सरकार हे सर्वसामान्याचं सरकार आहे. सर्वसामान्यांना अडीच वर्षात काय मिळालं, याचा विचार करायला हवा. मंदिर बंद, सण बंद, 'तुम भी घर मे बैठो, हम भी घर मे बेठते है', असं त्या सरकारचं काम होतं. बाळासाहेब म्हणायचे कार्यकर्ता घरात नाही, लोकाच्या दरात शोभून दिसतो. म्हणून आम्ही 'शासन आपल्या दारी' लोकांच्या घरापर्यंत घेऊन गेलो. या योजनेचा ५ कोटी लाभार्थ्यांना पैसे मिळाले. अशा योजना आधीही होत्या, मात्र त्या लोकांपर्यंत पोहचल्या नाहीत. 'सरकारी काम सहा महिने थांब' ,असं सरकार असल्याने माणूस कंटाळून अशा योजनेचा लाभ घेणं सोडून द्यायचा, असेही शिंदे म्हणाले.