Jalna News : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज ग्रा.पं.ला लाखोंची बक्षिसे जिंकण्याची संधी
Chief Minister Samriddhi Panchayat Raj Gram Panchayat gets a chance to win prizes worth lakhs
जालना, पुढारी वृत्तसेवा :
ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासामध्ये पंचायत राज संस्थांचे मोठे योगदान असून ती अधिक बळकट करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन ग्रामपंचायतीस लाखो रुपयांचे बक्षीस जिंकण्याची संधी प्राप्त करून द्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम. यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
ग्राम विकास विभागाच्या वतीने या अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून काम करणाऱ्या ग्रामपंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषदांना कामगिरीनुसार प्रोसाहित करण्यासाठी हे अभियान सुरू करण्यात आले आहे. शासनाच्या विविध योजनाचा समाजातील सर्व घटकांना लाभ देऊन ग्रामीण जनतेचे आरोग्यमान उंचावणे, ग्रामपंचायतीमध्ये लोकसहभागाची चळवळ उभा करणे ग्रामीण नागरिकांना सुलभरीतीने सेवा देणे, महाराष्ट्रातील थोर साधू संत परंपरेचा सहभाग घेणे, आरोग्य, शिक्षण, उपजीविका, सामाजिक न्याय या मुख्य क्षेत्रामध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदांसाठी २०२५-२६ या आर्थिक वर्षापासून तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर अशा चार स्तरावर प्रोत्साहन देण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हे पुरस्कार अभियान सुरू केले आहे.
या अभियानाचा कालावधी १७सप्टेंबर ते ३१ डिसेंबर राहणार आहे. गावाचे मूल्यमापन करण्यासाठी तालुका, जिल्हा विभाग व राज्यस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. या अभियानात सहभागी होण्यासाठी ग्रामपंचायतीस स्वयंमूल्यांकनाद्वारे अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १० जानेवारी असणार आहे. तालुकास्तरावरील मूल्यमापन ११ जानेवारी ते २६ जानेवारी, जिल्हा स्तरीय मूल्यमापन २८ जानेवारी ते १५ फेब्रुवारी, विभागस्तरीय मूल्यमापन १७ फेब्रुवारी ते २७फेब्रुवारी तर राज्यस्तरीय मूल्यमापन संपूर्ण मार्च महिन्यादरम्यान होणार आहे. सदरील अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम. व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पं) उदयसिंग राजपूत नियोजन करत आहेत.
असे राहणार ग्रा.पं.चे बक्षीस व पुरस्कार
तालुकास्तरावर प्रथम पुरस्कार १५ लक्ष, द्वितीय १२ लक्ष, तृतीय ८ लक्ष तर दोन ग्राम पंचायतींना विशेष पुरस्कार प्रत्येकी ५ लक्ष रुपयांचा असणार आहे. जिल्हास्तरावर प्रथम पुरस्कार ५० लक्ष, द्वितीय ३० लक्ष, तृतीय २० लक्ष, विभाग स्तरावर प्रथम पुरस्कार १ कोटी, द्वितीय ८० लक्ष, तृतीय ६० लक्ष रुपये, राज्य स्तरावर प्रथम पुरस्कार ५ कोटी, द्वितीय पुरस्कार ३ कोटी, तृतीय पुरस्कार २ कोटी रुपये.
मुख्य घटक विषय
सुशासन युक्त प्रशासन १६ गुण, सक्षम पंचायत १० गुण, जल समृद्ध, स्वच्छ व हरित गाव १९ गुण, मनरेगा व इतर योजनाशी अभिसरण ६ गुण, गाव पातळीवरील संस्था सक्षमीकरण १६ गुण, उपजीविका विकास, सामाजिक न्याय २३, लोक सहभाग व श्रमदान माध्यमातून लोकचळवळ निर्माण करणे ५ गुण, तर नाविन्यपूर्ण उपक्रम ५ गुण असे एकत्रित १०० गुणांचे हे मूल्यमापन असणार आहे.
पंचायत समितीस्तरावरील बक्षीस
विभाग स्तरावर प्रथम पुरस्कार १ कोटी, द्वितीय पुरस्कार ७५ लक्ष, तृतीय पुरस्कार ६० लक्ष रुपये, राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार २ कोटी, द्वितीय पुरस्कार १.५ कोटी, तृतीय पुरस्कार १.२५ कोटी
जिल्हा परिषद पुरस्कार
राज्यस्तरावर प्रथम पुरस्कार ५ कोटी, द्वितीय ३ कोटी, तृतीय २ कोटी. याशिवाय या अभियानाची जनजागृती, अभियानात लोकसहभाग वाढविण्यासाठी जास्तीत जास्त लोकांना प्रोत्साहित करणे व कार्यक्रमाची प्रसिद्धी करणाऱ्या विभागातील एका पत्रकारास पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

