

जालना : बस प्रवासादरम्यान कंडक्टरकडून एका महिलेवर व तिच्या मुलींवर मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तिर्थपुरी (ता. घनसावंगी, जि. जालना) येथील आरती विजयसिंग चव्हाण (वय 45) या आपल्या दोन मुलींसह 6 एप्रिल रोजी सकाळी बसने अंबडमार्गे जालन्याकडे येत होत्या. जालन्यात उपचारासाठी गेल्यानंतर सायंकाळी सुमारे 4.30 वाजता त्या अंबडकडे जाणाऱ्या (क्र. एमएच 14, एमएच 9221) या एसटी बसमध्ये बसल्या.
बस मध्ये गर्दी असल्याने त्यांना बसण्यासाठी जागा मिळत नव्हती. त्यामुळे त्या कंडक्टरच्या सीटजवळ बसल्या. बस अंबडजवळील लालवाडी परिसरात पोहोचल्यावर कंडक्टर महिलेने त्यांना जागेवरून उठण्यास सांगितले. यावरून दोघींमध्ये वाद झाला. फिर्यादी महिलेच्या म्हणण्यानुसार, कंडक्टरने मोबाईलमध्ये व्हिडिओ काढण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर अचानक तिकीट मशीनचा कोपरा डोक्यात मारून त्यांना जखमी केले.
या घटनेत महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र तुटून त्यातील सोन्याचे दागिने बसमध्ये पडल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तसेच महिलेच्या मुलींनाही शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप प्रवासी महिलेने दिलेल्या फिर्यादीत करण्यात आला आहे.
घटना मोबाईल मध्ये चित्रीत
दरम्यान, ही संपूर्ण घटना मुलीने मोबाईलमध्ये चित्रीत केली असून त्याची माहिती महिलेने आपल्या पतीला दिली. त्यानंतर पतीच्या सल्ल्याने त्या पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करण्यात आली. जखमी महिलेवर वैद्यकीय उपचार करण्यात आले आहेत.