

Burglary worth 18 lakhs; Accused arrested
जालना,पुढारी वृत्तसेवा ः जालना शहरातील रेल्वेस्टेशन रोडवरील महापालिका कार्यालयासमोर राहणाऱ्या नरेंद्र गुलाब सावजी या किराणा दुकानदाराचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी 17 लाख 76 हजार 161 रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना 11 नोव्हेंबर रोजी घडली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या चार तासांत कदीम जालना पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेला 17 लाख 76 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
जालना शहरातील शिवशक्ती मिल महानगरपालिका समोर राहणारे किराणा दुकानदार नरेंद्र गुलाबशहा सावजी हे 11 नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास सौरभ सुपर शॉपी या दुकानात साफसफाईचे काम करावयाचे असल्याने कुटुंबासोबत घराला कुलूप लावून गेले होते.ते रात्री 10 वाजता परत आल्यांनतर त्यांना घराचे कुलूप तोडलेले दिसून आले. त्यांनी घरात जाऊन पाहणी केली असता घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले.
त्यावेळी बेडरुम मधील स्टीलच्या डब्यात मुलाच्या लग्नासाठी त्यांनी विकत आणून ठेवलेले 8 लाख 34 हजार 161 रुपये किमतीचे चांदीचे धातुचे 07 नग विटकर (ठोकळा) प्रत्येकी सर्व मिळून 05 कि.ग्रॅ. तसेच 9 लाख 42 हजार रुपये रोख रक्कम त्यामध्ये 500, 200, 100, 50, 20 व 10 रुपये दराच्या चलनी नोटा असा 17 लाख 76 हजार 161 रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी घराचे दरवाजाचे कुलूप तोडून चोरून नेल्याची तक्रार त्यांनी कदीम जालना पोलिस ठाण्यात केली होती. घटनास्थळी पोलिस उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी भेट दिली होती. गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक डी.एस.मोरे यांच्याकडे देण्यात आला होता.
पोलिसांनी घटनास्थळाच्या जवळील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी व तांत्रिक विश्लेषण व खबऱ्याने दिलेल्या माहितीवरून अविनाश अंकुश वाघमारे (रा. माळीपुरा, जालना) व यशराज सतीश खांडेबराड व (रा. माळीपुरा जालना) यांना गांधी चमन भागातून 12 नोव्हेंबर रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली तसेच घरफोडीतील 17 लाख 76 हजार 161 रुपयांचे चांदीचे व रोख रक्कम त्याच्याजवळील बॅगमध्ये मिळून आली. सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर चार तासांच्या आत तो उघडकीस आणून कदीम जालना पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. कदीम जालना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जे.बी. शेवाळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.