

वडिगोद्री : मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर थेट सवाल उपस्थित केला आहे. “अजितदादा, तुमच्या मुलावर घातपात व खुनाचा कट रचला असता, तरीही तुम्ही गप्प बसला असता का? मग धनंजय मुंडे यांच्यावर का पांघरूण घालता? याचा पश्चाताप तुम्हाला २०२९ मध्ये होईल,” असे जरांगे पाटील म्हणाले.
ही प्रतिक्रिया त्यांनी श्री क्षेत्र नारायणगड (जि. बीड) यांच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या मंगल कार्यालयाच्या भूमिपूजन सोहळ्यात, काकडहिरा येथे माध्यमांशी बोलताना दिली. या कार्यक्रमाचे भूमिपूजन महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते संपन्न झाले.
जरांगे पाटील म्हणाले, “माझ्या जीवावर घातपाताचा कट रचला. नार्को टेस्टची मागणी मी केली नव्हती, पण आता ती करायचीच. सगळं बाहेर यावं. धनंजय मुंडे माझ्या खुनापर्यंत गेले. आता सुट्टी नाही, ना लपायचं आम्ही दोघंही नार्को टेस्टला जाऊ.”
ते पुढे म्हणाले, “कांचन नावाच्या व्यक्तीने या दोघांना माझ्या घरी येऊन परळीला नेले. म्हणजे परळीतच खुनाचा कट शिजला होता. धनंजय मुंडे आणि त्यांच्या साथीदाराने मिळून हा कट रचला हे सत्य आता उघड होणार आहे.”
जरांगे पाटील म्हणाले, “अजितदादांनी सावध राहावं. त्यांना बळ देऊ नये. प्रत्येक वेळी त्याला वाचवायचं नाही. हे मोठं षडयंत्र आहे. धनंजय मुंडेने या टोकापर्यंत जायला नको होतं. आता मी सोपा नाही. हे बाईसारखे धंदे आहेत. धनंजय मुंडेला मी शेख चिल्ली म्हणतो. अजितदादा, तुम्ही त्याला सांभाळा, नाहीतर २०२९ ला तुमची फजिती होईल.”
ते पुढे म्हणाले, “मी मुख्यमंत्र्यांनाही सांगितले आहे. या प्रकरणात माघार नाही. धनंजय मुंडेला चौकशीसाठी लवकर पाठवा. अन्यथा बीडमधून मी माध्यमांसमोर बोलून सर्व काही उघड करीन.”
राष्ट्रवादी काँग्रेसने नुकतीच जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत धनंजय मुंडे यांचा समावेश आहे. याबद्दल विचारले असता जरांगे पाटील म्हणाले,
“त्यांना डोनाल्ड ट्रम्पसोबत पाठवलं तरी मला हरकत नाही. पण आधी तपासणीसाठी पाठवा. सत्य बाहेर येऊ द्या.”
जरांगे पाटील म्हणाले, “मी कधीच बहीण-भावाला विरोध केला नाही. ते माझ्यावर टीका करत असताना मी त्यांना निरोपही पाठवले. मात्र, मराठा समाजावर अन्याय होत असेल तर मी शांत बसणार नाही. गोपीनाथ मुंडे यांच्या काळात असे कधी घडले नव्हते. पण धनंजय मुंडे चुकीच्या गोष्टींना साथ देतात, पाठीशी घालतात.”
ते पुढे म्हणाले, “पूर्वी ऊसतोड मुकादम-कामगार प्रामाणिक होते, पण धनंजय मुंडे यांनी नंतर त्यांना बळ दिलं. आता नार्को टेस्टमधून दूध का दूध, पाणी का पाणी होऊ द्या,” असेही जरांगे पाटील म्हणाले.