BJP 'Mission Lotus' : भाजपाचे 'मिशन लोटस', महापालिका ताब्यात घेण्यासाठी जोरदार फिल्डिंग
BJP's 'Mission Lotus': Intense efforts underway to take control of the municipal corporation.
जालना, पुढारी वृत्तसेवा : एकीकडे निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. मंगळवारपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. मात्र, अद्यापि महायुतीसंदर्भात भाजपाने ठोस अशी भूमिका घेतली नसल्याचे दिसून येत आहे. असे असले तरी नगरपालिकेच्या निकालाने भाजपाचा आत्मविश्वास दुणावला असून, पहिल्यावहिल्या महापालिकेवर झेंडा रोवण्यासाठी भाजपाच्यावतीने जोरदार फिलिंडग सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी बड्या राजकीय नेत्यांच्या चकरा देखील वाढल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जालन्यात पक्षाच्या प्रमुख नेत्यांची भेट घेतली. त्यांनी देखील मित्र पक्षासोबत महायुती संदर्भातला निर्णय मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात ढकलला. तर मंगळवार, २३ रोजी गृहराज्य मंत्री पंकज भोयर देखील जालना दौऱ्यावर असताना स्थानिक पातळीवरील मित्र पक्षातील वरिष्ठ नेते बसतील. त्यावर चर्चा करतील आणि त्यानंतर बरची नेतेमंडळी युती संदर्भात निर्णय घेतील, असे सांगितले. त्यामुळे अजून तरी भाजपाकडून महायुतीसंदर्भात ठोस अशी भूमिका समोर आलेली दिसून येत नाही. तर दुसरीकडे शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी दोन दिवसांत युतीसंदर्भात निर्णय घ्यावा, अन्यथा आम्ही निर्णय घेण्यास मोकळे होऊ, अशी भूमिका घेतली.
दर्शना बंगल्यावर मंगळवारी गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी आमदार अर्जुनराव खोतकर यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान जालना जालना शहर महानगरपालिका महानगरपालिका तसेच आगामी निवडणुकांबाबत सकारात्मक सविस्तर चर्चा झाली, असा दावा शिवसेनेने केला आहे. जालन्याचे राजकारण बघता सद्यस्थितीत नगरपालिका निवडणुकीत भाजपाने बाजी मारली आहे. दोन नगराध्यक्षांसह २८ नगरसेवक निवडून आणले आहेत. त्यामुळे भाजपाचा आत्मविश्वास बळावला आहे. महापालिकेच्या निवडणुकीत ज्या ठिकाणी शक्य आहे तेथे महायुती, काही ठिकाणी मैत्रिपूर्ण लढत तर काही ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढविण्याचा फॉर्म्युला महापालिकेच्या निवडणुकीत आखण्याच्या तयारीत असल्याचे चित्र आहे. भोकरदनमध्ये भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाने युती करून निवडणूक लढवली तर परतूर आणि अंबडमध्ये स्वबळावर आपले उमेदवार उभे केले.
अशाच पध्दतीने जालना महापालिकेच्या, निवडणुकीत काही प्रभागांत मंत्रीपूर्ण लढत तर काही प्रभागात स्थळावर निवडणूक लढवल्या जातील, असे सांगणे काही वावगं ठरणार नाही. दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाने महापालिका निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढवण्याची तयारी दाखवली आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांनी शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांच्यासोबत आमची युती निश्चित असल्याची घोषणा यापूर्वी केलेलीच आहे.
भाजपाच्या भूमिकेवर निवडणुकीचे सर्व गणित अवलंबून असणार आहे. सध्या तरी आतापर्यंत सर्वच पक्षांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यावर भर दिला आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेसने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. शिवसेना उवाठा आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्यावतीने देखील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत. महापालिकेच्या निवडणुकीत इच्छुकांची मांदियाळी पहायला मिळत आहे. युती किंवा आघाडी झाल्यास नाराजांचीही संख्या वाढणार आहे. हे मात्र निश्चित.
महाविकास आघाडीला कसे मिळेल बळ ?
त्या वेळी नगरपालिकेवर काँग्रेसची सत्ता होती. काँग्रेसचे २८ नगरसेवक निवडून आले होते. तर शिवसेनेचे ११ नगरसेवक पालिकेचा कारभार हाकत होते. मात्र, आता माजी आमदार कैलास गोरंट्याल है भाजपात तर भास्कर अंबेकर हे शिवसेना शिदे गटात दाखल झाल्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यामुळे महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी महाविकास आघाडीला अधिकचा घाम गाळावा लागणार आहे. हे मात्र निश्चित.
तर इच्छुकांचा होईल हिरमोड...
जालना महापालिकेत एकूण ६५ जागा आहेत. त्यासाठी भाजपाकडून २०० इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत. तर उबाठाकडून १२६ उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत. तिच परिस्थिती काँग्रेस, राष्ट्रवादी श. प. गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गटाची आहे. विविध पक्षांच्या सुमारे १४०० उमेदवारांनी उमेदवारी अर्ज घेतले आहेत. युती आघाडी झाल्यास इच्छुकांचा हिरमोड होऊन बंडखोरीची शक्यता नाकारता येत नाही.
महायुती होण्याची शक्यता आहे
जालना महापालिकोत महायुती होण्याची ९० टक्के शक्यता आहे. अजून महायुती झाल्यानंतर जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरणार आहे. महापौरपदाचे आरक्षण जाहीर झाले नसल्याने त्याच्यावर भाष्य करणे सोयीचे नाही. - कैलास गोरंट्याल, माजी आमदार, भाजपा नेते.

