

The taluka police seized cannabis worth nine lakh rupees.
जालना, पुढारी वृत्तसेवा: गांजाची तस्करी करणाऱ्या आरोपीच्या तालुका पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. ही कारवाई रविवार, दि. २१ रोजी रिंगरोड रेवगाव फाटा येथे करण्यात आली. या कारवाईत सुमारे ९ लाख रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला असून, आरोपीला जेरबंद करण्यात आले आहे.
या विषयी अधिक माहिती अशी, पोनि. साबळे गस्तीवर असताना त्यांना एक व्यक्ती अवैधरीत्या गांजा विक्री करण्याकरिता जालना शहरातील मंठा चौफुली ते अंबड चौफुली दरम्यान रेल्वे ब्रीजजवळ रेवगाव फाटा येथे येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली. त्यांनी त्वरित तालुका पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकास माहिती ठिकाणी सापळा लावण्याच्या सूचना केल्या.
दरम्यान, सकाळी अंदाजे ४ वाजेच्या सुमारास रेवगाव फाटा येथे एक संशयित व्यक्ती मिळून आला. त्यास स्टाफच्या मदतीने ताब्यात घेऊन नाव गाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव भरत बाबासाहेब कासार, (२५, रा. शंकुतलानगर मंठा चौफुली जालना) असे सांगितले. त्याचेजवळील बॅगमध्ये काय आहे असे विचारले असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांने सदर बॅगमध्ये गांजा असल्याचे सांगितले.
ही माहिती वरिष्ठांना कळवून त्या व्यक्तीस बॅगसह पोलिस स्टेशन तालुका जालना येथे आणून कायदेशीर कारवाई करण्यात आली. सदर इसमाकडे एकूण १८ किलो गांजा मिळून आला. ज्याची किंमत ९ लाख रुपये एवढी आहे. गांजा जप्त करण्यात आला असून, त्याच्या विरोधात तालुका पोलिस ठाण्यात पोलिस अंमलदार वसंत धस यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हयाचा तपास सपोनि. घनश्याम अंतरप करीत आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी, उप विभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली पोनि. संतोष साबळे, पोहेकॉ. सचिन आर्य, पोअं. वसंत धस, पोअं. विशाल काळे, पोअं. कृष्णा भंडागे, पोअं. राम शेडीवाले, पोअं- चंद्रकांत माळी, पोअं. दयानंद मोरे यांनी पार पाडली आहे.
१८ किलो गांजा जप्त
तालुका पोलिस ठाण्याच्या कारवाईत सुमारे १८ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. त्याची अंदाजे किंमत ९ लाख रुपये इतकी आहे. एवढ्या मोठ्या किमतीचा गांजा कोठून आणला, कुठे तस्करी करण्यात येत होती. या तस्करीपाठीमागे कोण कोण आहे. या दिशेने पोलिस तपास करीत आहे.