

Worm infestation on gram crop
आन्वा, पुढारी वृत्तसेवा : मागील दोन ते तीन दिवसांपासून असलेल्या ढगाळी वातावरणामुळे हरभरा पिकावर अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. मागील काही वर्षांपासून शेतीचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. यावर्षी तर खरीप हंगामामध्ये सोयाबीनचे मोठे नुकसान झाले, तर अतिपावसामुळे कपाशीवर बोंडअळी आली. त्यामुळे दोन्ही पिके शेतकऱ्यांच्या हातून गेले. दरम्यान, पिकाचेही मोठे नुकसान झाले. त्यामुळे जगायचे कसे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
रब्बीकडे शेतकऱ्यांनी लक्ष देणे सुरू केले. हरभरा, गहू आदी पिकांची लागवड केली. मात्र हे पिकही सद्यस्थितीत बिकट अवस्थेत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. हरभरा पेरणीवर यावर्षी शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रित केले. सध्या हरभरा पीक चांगले बहरले असतानाच आता ढगाळी वातावरणामुळे अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. अळीला आटोक्यात आणण्यासाठी शेतकरी महागडी औषध फवारणी करीत आहेत. मात्र अळी आटोक्यात येत नसल्याने हे पीकही हातून जाते की काय, अशी भीती शेतकऱ्यांना आहे.
त्यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांना फवारणीचे औषध पुरवावे, अशी मागणी केली जात आहे. आता ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या खरीप पिकांसह रब्बी पिकांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुसरीकडे अतिवृष्टीच्या तडाख्यातून वाचलेल्या पिकांवर रोगराईचा परिणाम झाला आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे. अशातच बँकांकडून शेतकऱ्यांनी कर्ज काढले आहे. आता हे कर्ज फेडायचे कसे, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे.
हरभरा पिकावर अळीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने हरभरा पीक धोक्यात आले असून, यंदा शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया गेला आहे. उरली सुरली पिके परतीच्या पावसाने वाया गेली. अशा स्थितीत शेतकरी रब्बी हंगामावर अवलंबून असून, वातावरणातील बदलांचा फटका रब्बी हंगामातील पिकांवर मोठ्या प्रमाणात घाटे अळीचा प्रादुर्भाव वाढला असला तरी कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून मार्गदर्शन केले जावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.