

आन्वा ः भोकरदन तालुक्यात चारा-पाण्याच्या शोधात शेकडो मेंढ्यांसह मेंढपाळ बिऱ्हाडासह गावोगावी फिरताना दिसत आहेत. पशुधनाच्या चाऱ्यासोबत पाण्यासाठी दाही दिशा भटकंती करताना मोठी कसरत होताना दिसून येत आहे. शासनाच्या वतीने मेंढ्यासाठी चराईक्षेत्र सोडण्यासह मेंढपाळावर होणार्या हल्ल्यासंदर्भात कठोर कायदा करण्याची मागणी होत आहे.
थंडीच्या काळात मोठ्या प्रमाणावर आलेले मेंढपाळ हे पशुधनासाठी पाण्याच्या शोधात असतात आणि पर्यायानेच बरेच मेंढपाळ हे परिसरात थोड्याफार अंतरावर ठिय्या मांडतात. त्याचा विपरीत परिणाम हा चाऱ्यावर होऊ लागतो, त्यांना शेकडो पशुधनाच्या चाऱ्यासाठी वाढत्या तापमानाची पर्वा न करता मैलोमैल भटकंती करावी लागत आहे.
पुन्हा पाण्यासाठी तेवढीच पायपीट करुन मेंढपाळांना पाण्याच्या ठिकाणावर यावे लागते. एवढे सर्व कष्ट सहन करुनही मुक्कामाच्या ठिकाणी रात्रीच्या वेळी आम्हाला जागे राहावे लागते. शेळ्या-मेंढ्यांना चारा-पाणी मिळावे यासाठी मेंढपाळांवर रानोमाळ भटकंती करण्याची वेळ आली आहे. या भागात दाखल झालेले मेंढपाळांचे कळप मजल दरमजल करीत जिकडे चारा-पाणी भेटेल तिकडे स्थलांतर करीत आहेत.
चारापाण्याअभावी वाळलेला चारा. बाभळी क निंबाच्या पाल्यावर गूजराण करावी लागत आहे परिणामी. मेंढपाळ चारा भेटेल त्या ठिकणी शेळ्या-मेंढ्यांना घेऊन जात आहेत. गावोगावी भटकंती करून शेतात उघड्यावरच संसार टाकण्यासाठी मेंढपाळांना शेतकऱ्यांना विनवण्या कराव्या लागत आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या शेतात चारा पाणी आहे, त्याठिकाणी मेंढपाळ आपले बिऱ्हाडा टाकत आहेत.
चारा आणि पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे मेंढपाळांना कुटुंबासह व मेंढ्या-शेळ्यांच्या कळपासह गावोगावी, जंगल परिसरात वनवन भटकंती करावी लागत आहे. शासनाने वेळीच उपाययोजना केल्या नाहीत तर मेंढपाळांच्या उपजीविकेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पूर्वी उपलब्ध असलेली कुरणे, चारागावे आणि ओढे-नाले पूर्णपणे आटले असून जनावरांसाठी पुरेसा हिरवा किंवा कोरडा चारा मिळणे कठीण झाले आहे. अनेक मेंढपाळांना दररोज 10-15 किलोमीटर अंतर पायी कापावे लागत असून थंडीचा जोर वाढत असल्यामुळे जनावरांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत आहे. काही ठिकाणी जनावरे आजारी पडण्याचे व दगावण्याचे प्रकारही समोर येत आहेत.