

डोणगाव : भोकरदन तालुक्यातील राजूर येथे माळरानाची जमीन, मर्यादित पाणीसाठा आणि अल्प क्षेत्र अशी परिस्थिती असतानाही शेतकरी परशुराम भाऊसाहेब पुंगळे यांनी जिद्द, मेहनत आणि योग्य नियोजनाच्या जोरावर डाळिंबाची बाग फुलवली आहे. कमी क्षेत्रात डाळिंबाची लागवड करून त्यांनी लाखो रुपयांच्या उत्पादनाचा मार्ग तयार केला असून, सेंद्रिय शेतीला प्राधान्य देत केलेला त्यांचा हा प्रयोग परिसरातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
भोकरदन तालुक्यातील राजूर येथील अल्पभूधारक शेतकरी परशुराम पुंगळे यांनी पारंपरिक पिकांपेक्षा कमी क्षेत्रातून अधिक उत्पन्न मिळविण्याच्या उद्देशाने डाळिंब लागवडीचा निर्णय घेतला. माळरानावर डाळिंबाची बाग उभी करणे हे सुरुवातीला आव्हानात्मक होते मात्र, जमिनीची योग्य मशागत, सेंद्रिय खतांचा वापर, नैसर्गिक पद्धतीने जमिनीची सुपीकता टिकविणे, योग्य खत व्यवस्थापन आणि वेळोवेळी आवश्यक पिकांचे व्यवस्थापन करून त्यांनी बाग जोपासली.
पाण्याची उपलब्धता मर्यादित असल्याने पुंगळे यांनी ठिबक सिंचनाचा वापर केला प्रत्येक झाडाला गरजेनुसार पाणी देत त्यांनी पाण्याची बचत केली योग्य पाणी व्यवस्थापनासोबत सेंद्रिय पद्धतीचा अवलंब केल्यामुळे जमिनीची गुणवत्ता टिकवून ठेवण्यावर त्यांनी भर दिला आहे त्यामुळे झाडांची वाढ चांगली झाली असून, बागेत फळधारणाही समाधानकारक झाली आहे. माळरानावर हिरवीगार झालेली डाळिंबाची बाग सध्या परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
फुलशेतीतूनही उत्पन्नाचा नवा मार्ग
डाळिंब शेतीसोबतच परशुराम पुंगळे यांनी फुलशेतीलाही विशेष महत्त्व दिले आहे. त्यांच्या शेतात सुमारे दहा गुंठे क्षेत्रात पर्पल शेवंतीची लागवड करण्यात आली असून, त्यातून सुमारे २०० किलो उत्पादन मिळाले आहे तसेच अर्धा एकर क्षेत्रात गुलाबाची लागवड केली असून, त्यातून सुमारे ४०० किलो उत्पादन मिळाले आहे याशिवाय त्यांनी विविध प्रकारच्या फुलांची लागवड करून शेतातील उपलब्ध क्षेत्राचा योग्य पद्धतीने वापर केला आहे.
लाखो रुपयांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा
सध्या त्यांच्या डाळिंब बागेत उत्पादन सुरू असून, बाजारपेठेत चांगला दर मिळाल्यास त्यातून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.
डाळिंबासोबत पर्पल शेवंती, गुलाब आणि विविध प्रकारच्या फुलांची लागवड करून ‘कमी क्षेत्र, विविध पिके आणि अधिक उत्पन्न’ हा शेतीचा नवा प्रयोग त्यांनी राजूर परिसरात उभा केला आहे.