Auto market : दीपावलीच्या मुहूर्तावर वाहन बाजारात तेजी !

इलेक्ट्रिक वाहनांना ग्राहकांची पसंती; अनेक कंपन्यांच्या वाहनांसाठी प्रतीक्षा
Auto market
Auto market : दीपावलीच्या मुहूर्तावर वाहन बाजारात तेजी !file photo
Published on: 
Updated on: 

जालना, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असतानाही यंदाच्या दिवाळीत दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या विक्रीने समाधानकारक कामगिरी केली आहे. आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असतानाही नागरिकांनी वाहन खरेदीला प्राधान्य दिल्याने वाहन विक्रेत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, पेट्रोल आणि डिझेल वाहनांसोबतच इलेक्ट्रिक वाहनांकडे ग्राहकांचा वाढता कल दिसून आला. काही नामांकित कंपन्यांच्या इलेक्ट्रिक वाहनांना मागणी अधिक असल्याने ग्राहकांना वाहनांसाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र शहरातील शोरूममध्ये पाहायला मिळाले.

Auto market
Jalna BJP Diwali Celebration : भाजपाची ऊसतोड कामगारांसोबत दिवाळी साजरी

दिवाळी हा वाहन खरेदीसाठी शुभमुहूर्त मानला जातो. याच पार्श्वभूमीवर लक्ष्मीपूजन आणि बलिप्रतिपदा अर्थात पाडव्याच्या मुहूर्तावर अनेक नागरिकांनी नवीन दुचाकी आणि चारचाकी वाहने घरी आणली. त्यामुळे जालना शहरातील विविध वाहनांच्या शोरूममध्ये ग्राहकांची मोठी गर्दी झाली होती. नवीन वाहन खरेदीसाठी कुटुंबासह शोरूममध्ये येणाऱ्या ग्राहकांची संख्या लक्षणीय होती.

यंदा वाहन खरेदीमध्ये इलेक्ट्रिक वाहनांना विशेष पसंती मिळाल्याचे दिसून आले. वाढते इंधन दर, इंधनावरील खर्चात बचत आणि पर्यावरणपूरक पर्याय म्हणून ग्राहक इलेक्ट्रिक वाहनांचा विचार करत आहेत. त्यामुळे इलेक्ट्रिक दुचाकी तसेच चारचाकी वाहनांच्या मागणीत वाढ झाल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. काही लोकप्रिय मॉडेल्ससाठी ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागत आहे.

Auto market
Jalna Crime : कर्मचाऱ्याला फायटरने मारहाण; जीवे मारण्याची धमकी

दिवाळीच्या सणामुळे केवळ वाहन विक्रीलाच नव्हे, तर शहरातील कपड्यांची दुकाने, इलेक्ट्रॉनिक्स शोरूम आणि इतर व्यावसायिकांनाही चांगला व्यवसाय मिळाला. सणासुदीच्या खरेदीमुळे बाजारपेठेत चैतन्य निर्माण झाले होते.

वाहन उद्योगांस दिलासा

एकंदरीत, दुष्काळी परिस्थितीचा परिणाम बाजारपेठेवर होण्याची शक्यता असतानाही दिवाळीच्या निमित्ताने वाहन उद्योगासह विविध व्यावसायिक क्षेत्रांना दिलासा मिळाला आहे. ग्राहकांचा उत्साह आणि इलेक्ट्रिक वाहनांकडे वाढता कल यामुळे वाहन विक्रेत्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

जिल्ह्यात दुष्काळ असल्याने त्याचा वाहनविक्रीवर परिणाम होईल, असे वाटत होते. मात्र, जवळपास अडीच हजार दुचाकी वाहने विक्री झाल्याचा अंदाज आहे. दीपावलीच्या शुभमूहुर्तावर नागरिकांनी ईवाहनांची खरेदीही मोठ्या प्रमाणात केल्याचे दिसून आले. वाहनबाजारात दुचाकींची समाधानकारक विक्री झाली.
सचिन शाह, दुचाकी वाहन विक्रेते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.