

अंबड : तालुक्यातील बेलगाव येथील पाणीपुरवठ्यासाठी टँकर सुरू करताना आपल्याला का बोलावले नाही, या कारणावरून संतप्त झालेल्या एका व्यक्तीने पंचायत समिती कार्यालयात शासकीय कामकाज करत असलेल्या कनिष्ठ सहायकाला शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याच्या हातातील फायटर हिसकावून त्याच फायटरने कर्मचाऱ्याच्या डोक्यात वार करून गंभीर जखमी केल्याची घटना २ नोव्हेंबर रोजी दुपारी सुमारे ३.१५ वाजता घडली.
प्रमोद नारायण वाघ (वय ४१, रा. धाईतनगर, अंबड) असे जखमी कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते मागील सहा वर्षांपासून पंचायत समिती कार्यालय अंबड येथे कनिष्ठ सहाय्यक म्हणून कार्यरत असून त्यांच्याकडे पाणीटंचाई निवारण विभागाची जबाबदारी आहे.
या बाबत पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे कि, २ नोव्हेंबर रोजी दुपारी वाघ हे ग्रामपंचायत अधिकारी विष्णू कोल्हे यांच्यासोबत कार्यालयात शासकीय कामकाज करत होते. यावेळी कैलास दत्तू लहामगे (रा. दहिगव्हाण खु., ता. अंबड) हा तेथे आला. बेलगाव येथे पाण्याचे टँकर सुरू करताना आपल्याला का बोलावले नाही, असा जाब विचारत त्याने वाघ यांना शिवीगाळ करून चापटाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.
यावेळी विष्णू कोल्हे यांनी मध्यस्थी करून आरोपीला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने हातातील फायटरने वाघ यांच्या डोक्यात वार केला. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्राव सुरू झाला. त्यानंतर आरोपीने तेथून पळ काढताना, पोलिसांत तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचे वाघ यांनी आपल्या जबाबात नमूद केले आहे.
उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल
घटनेनंतर सहकारी हरकळ आणि विष्णू कोल्हे यांनी जखमी वाघ यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, अंबड येथे दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना सामान्य रुग्णालय, जालना येथे हलविण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.