

Anxiety is gone; Machhindranath Chincholi lake overflow
घनसावंगी, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील मच्छिंद्रनाथ चिंचोली येथील लघुसिंचन तलाव सलग दुसऱ्या वर्षी जोरदार झालेल्या मुसळधार पावसामुळे ओसंडून वाहत आहे. तलावात जमा झालेल्या पाण्यामुळे मच्छिंद्रनाथ चिंचोलीसह परिसरातील चार ते पाच गावांतील सिंचनाचा तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार असल्याने उन्हाळ्यात होणारी पाण्यासाठीची पायपीट थांबणार असल्याने शेतकऱ्यांसह नागरिक आनंदात आहेत. तसेच तालुक्यातील मांदळा तलाव देखील ९० टक्के भरले आहे.
तालुक्यात खरीप हंगामात ९० हजार हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. त्यात सर्वाधिक पेरा कपाशी खलोखाल सोयाबीन तसेच तुरीचा आहे. सुमारे ३५ दिवसाच्या विश्रांती नंतर १६ जुलैच्या मुसळधार पावसाने सर्व महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. तालुक्यातील सर्व नदी, नाले तसेच पुलावरून पाणी वाहल्याने ठिकठिकाणी वाहतूक खोळबली होती. तसेच वानेगाव परिसरात झालेल्या पावसाने तालुक्यातील सर्व लहान मोठ्या नद्याना पूर आला होता.
आणि पुन्हा दि.२१ जुलैच्या मध्यरात्री नंतर पावसाने पुन्हा रिमझिम तसेच मुसळधार पावसाच्या हजेरीने शेतात पाणी साचल्याने पूर्ण पिक मुलुल होत आहेत. मुसळधार पावसाने तालुक्यात खरीपाच्या शेतीचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या मागणीनुसार त्रिस्तरीय ग्राम समितीकडून शासनाच्या आदेशाने तात्काळ पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे.
यंदा मे महिन्यात अतिवृष्टीचा मुसळधार पाऊस तसेच अवकाळीने उन्हाळी पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मात्र सर्व तलावात बऱ्यापैकी पाणी पातळी वाढली होती. आणि नंतर पून्हा १६ व २१ जुलैनंतर तालुक्यात रिमझिम तसेच अधूनमधून सततच्या पडणाऱ्या मुसळधार पावसाने सोयाबीन, कपाशी, तूर तसेच मुगात अक्षरशः गुडघ्या इतके पाणी जमा झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र शेतकऱ्यांसह नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी महत्वाचा असणारा मच्छिंद्रनाथ चिचोली लघुसिंचन तलाव या पाण्याने जुलै महिन्यातच ओसंडून वाहत आहे. तसेच मांदळा तलाव देखील ९० टक्के भरल्याने परिसरातील विहिरींची पाणीपातळीत देखील झपाट्याने वाढ झाल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांतून समाधान व्यक्त केले.
मच्छिंद्रनाथ चिंचोली येथील लघुसिंचन तलाव सलग दुसऱ्या वर्षी ओव्हरफ्लो होऊन ओसंडून वाहत आहे. आणि मांदळा तलाव देखील ९० टक्के भरला असल्याने पुन्हा परिसरात एकदा पाऊस झाल्याने हा तलाव देखील भरणार आहे. सततच्या होणाऱ्या पावसाने परिसरात नदी, नालेदेखील जुलै महिन्यातच भरभरून वाहत असल्याने भविष्यात उन्हाळ्यातील टँकरने होणारा पाणी पुरवठा बंद होणार असल्याने शेतकऱ्यांसह ग्रामस्थांत आनंदाचे वातावरण आहे.