

Anwa became a hotbed of illegal businesses
आन्वा, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील आन्वा गावात गेल्या वर्षभरापासून अवैध धंदे बोकाळली असून प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेले गाव आता अवैध धंद्याचे माहेरघर बनले असून याकडे पोलिस प्रशासनाचे साफ दुर्लक्ष करीत असल्याचे आरोप नागरिकांतून होत आहेत. खुलेआम चालणाऱ्या या धंद्यांवर आळा घालावा, अशी मागणी होत आहे.
गाव परिसरात बेकायदा दारू विक्रेत्यांची चांगलीच चांदी होत आहे. रात्री-अपरात्री दारू पिऊन ढाब्यावर हाणामाऱ्या, गोंधळ, हा नित्याचाच प्रकार झाला आहे. त्यामुळे गावची शांतता सुरक्षितता धोक्यात येऊ लागली आहे. पोलिसांनी वेळीच लक्ष घालून अवैध धंद्यांना आळा घालावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अवैध दारूविक्रीसह आता परिसरात जुगार, मटका, वाळू वाहतूक तांदूळ व्यवसायालाही तेजी आल्याचे चित्र दिसून येत आहे.
गावात मटका घेणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने वरिष्ठांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आता नागरिकांतून केल्या जात आहे. वरळी मटका घेणाऱ्याचे मनसुबे आता उंचवली असून कोणालाही ते जुमानत नाही. एका रुपयाला ९० रुपये देणारा हा व्यवसाय लपून, छपून चालत होता. ओपन टू क्लोजमध्ये खेळला जाणारा हा एक प्रकारचा जुगार संसार उद्धवस्त करणारा ठरत आहे. मागील काही महिन्यांपासून गावात एका मकानात किंवा घरात या व्यवसायाची खुलेआम सट्टा पिढी बनविली जात आहे. यात सट्टा लावणाऱ्याची संख्या मोठी आहे.
सट्ट्याचे आकडे पावत्या किंवा मोबाईलवर पहायला मिळत असल्याने या व्यवसायात विश्वास आहे. पण, यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर येत असले तरीही हा व्यवसाय नगदी व उधारीवर चालत असल्याचे सांगितले जाते. परिसरातील गावांमध्येही अवैध धंदे जोरात सुरू असून, तेथील ग्रामस्थ त्याला वैतागले आहेत. पोलिसांच्या आशीर्वादामुळे हे व्यावसायिक सुरू असल्याने कोणालाच जुमानत नाहीत. या गावांमधील अवैध धंदे बंद करण्याची मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.
सट्टा जुगारावर तरुणांना एका रुपयात नव्वद रुपये मिळविता येत आहेत. क्रमांकाच्या अंदाजावर आकडेमोड करून सट्ट्याचे गणित मांडल्या जात आहे. तरुणांसोबत शासकीय सेवेतील कर्मचारी देखील सट्ट्याच्या आहारी गेले आहेत. मात्र या नादात पैसा मिळवण्यापेक्षा गमावणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
ग्रामीण भागातील तरुण कमी गुंतवणुकीचा व्यवसाय म्हणून पानठेला, चहाची टपरी अशा व्यवसायाकडे वळत होते. मात्र, आता कमी गुंतवणुकीत जादा नफा कमावण्याच्या नादात दारूविक्री, सट्टा, जुगार, मटका अशा अवैध धंद्यांकडे त्यांचा कल वळल्याचे दिसून येत आहे.