

Rotavator was rotated on coriander as it was not getting the right price
पिंपळगाव रेणुकाई, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव सध्या रेणुकाई येथील कृष्णा देशमुख या शेतकऱ्याने दर नसल्यामुळे चक्क कोथिंबिरीच्या प्लॉटमध्ये रोटावेटर फिरवला. कोथिंबिरीला पिंपळगाव रेणुकाई येथील बाजारात कवडीमोल दर मिळत आहे. कोथिंबीर काढणी व वाहतूक दर ही परवडत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
पिंपळगाव रेणुकाई येथे मुख्य बाजारपेठ असल्याने मंगळवारी येथील आठवडे बाजारात कोथिंबिरीला भाव नाही. तसेच व्यापार्यानी कोंथिबीर घेण्यास नकार दिल्याने भाजीपाला उत्पादक शेतकरी हतबल झाले आहे. लागवड खर्च, काढणीचा खर्च, भाडे निघत नसल्याने हतबल झालेल्या शेतकर्याने कोथिंबिरीवर थेट रोटावेटर फिरवला आहे.
जून महिन्यात एक एकर क्षेत्रावर कोथिंबिरीची लागवड केली होती. परंतु सुरुवातीपासून पाणी कमी असल्यामुळे शेतकऱ्याने आपल्या विहिरीतील व आजूबाजूचे विहिरीतील पाणी घेऊन स्पिंकलरच्या साह्याने कोथिंबीर जगवली. मात्र कोथिंबिरीला व्यापारीसुद्धा घेत नसल्या कारणाने त्या कोथिंबिरीला शेतातच शेतकऱ्यांनी रोटावेटर फिरवला आहे. शेतकरी आर्थिक फटका बसला आहे.
एका एकर क्षेत्रावर कोथिंबीर लागवड केली होती. परंतु बाजारात कोथिंबिरीला भाव नसल्यामुळे व्यापारीही घेण्यास तयार नाही. कोथिंबिरीसाठी पंधरा ते वीस हजार रुपये खर्च केले. एक रुपयाला कोंथिबिरीची जुडी घेण्यास कुणी तयार होईना. लागवड खर्चही निघणे अवघड झाले आहे. भाजीपाला उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.